

पारंपरिक भाताबरोबर पौष्टीक गुणधर्मामुळे सध्या काळ्या लाल आणि जांभळ्या रंगाच्या भात लागवडीवर भर दिला आहे. रायगड जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी 23 हेक्टर क्षेत्रावर नाविन्यपूर्ण योजनेतून लाल काळ्या भाताची लागवड होणार आहे. त्यासाठी आत्मा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्यांना लाल काळ्या जांभळ्या रंगाच्या जातीचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यात यंदा अशा रंगीत प्रजातींच्या भाताच्या क्षेत्रात वाढ होत आहे. मागील वर्षापर्यंत जिल्ह्यात 210 हेक्टर क्षेत्रात लागवड केली जात होती. यंदाच्या खरीप हंगामासाठी 23 हेक्टर क्षेत्रावर नाविन्यपुर्ण योजनेतून लाल, काळ्या भाताची लागवड केली जाणार आहे.
रायगड जिल्ह्यात यंदा विविध रंगी भात पीक लागवडीचे प्रयोग घेण्यात आले आहेत. यासाठी ’आत्मा’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्यांना काळा, लाल आणि जांभळ्या रंगाच्या भात प्रजातींचे बियाणे उपलब्ध करुन देण्यात येते. या तांदळाला मागणी वाढत असल्याने शेतकर्यांना चांगला फायदा मिळत आहे. 2019 पासून यास प्रोत्साहन देण्यात येत असल्याने आतापर्यंत रंगीत भाताच्या लागवडीचे क्षेत्र 210 हेक्टरपर्यंत वाढले आहे. यंदाच्या नाविन्यपूर्ण योजनेतून हळद, ड्रॅगनफ्रुट, करटोली, काळीमिरी या सारख्या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
म्हसळा तालुक्यात 3 हेक्टर जागेत नाविन्यपुर्व योजनेतून केली जात आहे तर रोहा तालुक्यात 20 हेक्टर क्षेत्रात लाल, काळा भाताची पेरणी झाल्याची माहिती जिल्हा कृषि अधिक्षक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली.
मान्सूनचे आगमन लवकर झाल्याने जिल्ह्यातील भात पेरणीची कामे रखडली आहेत. शेतात पाणी साचलेले असल्याने धुळवाफ्यावरील पेरणी करता आलेली नाही. अशा परिस्थितीत जिल्ह्यात 60 टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात यंदा 1 लाख 24 हजार हेक्टर भात लागवडीचे नियोजन होते, परंतु इतक्या क्षेत्रासाठी पुरेशी पेरणी न झाल्याने यंदा भाताची रोपे कमी पडण्याची भीती शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, अशा विकट परिस्थिती नाविन्यपूर्व योजनेतून रंगीत भाताची पेरणी करण्यात शेतकर्यांना यश आले आहे.
भाताची उत्पादकता आणि उत्पादन वाढावे यासाठी कृषी विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आधुनिक भात लागवड पध्दती आणि संकरित बियाण्यांचा वापर शेतकर्यांनी करावा यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र अजूनही लिख पारंपरिक बियाण्यांच्या वापराकडे शेतकर्यांचा कल अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकर्यांना संकरित बियाणे लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
कृषी विभागातर्फे आत्मा योजनेंतर्गत यंदा जिल्ह्यात लाल, काळा आणि जांभळ्या रंगातील भात उत्पादन घेतले जाणार आहे. यासाठी शेतकर्यांना संकरित भात बियाणे उपलब्ध करून दिले आहे. मध्यप्रदेश आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथून यासाठी बियाणे मागविण्यात आले होते. या बियाण्यांचा वापर करून यंदा 233 हेक्टरवर लाल, काळ्या आणि जांभळ्या रंगाच्या भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. यातून उत्पादित होणार्या भात पिकाच्या मार्केटिंगचे प्रयत्नही कृषी विभागामार्फत केले जाणार आहेत.
लाल, काळ्या आणि जांभळ्या रंगाच्या या भातात प्रथिने आणि करबोदकांचे प्रमाण सामान्य भाताच्या तुलनेत अधिक असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. हा भात मधुमेह आणि इतर आजारातील रुग्णांसाठी उपयुक्त असल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे अलिकडच्या काळात या प्रकारच्या भाताला मागणी वाढली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात लाल, काळ्या आणि जांभळ्या रंगाच्या भाताची लागवड करण्यात आली आहे. यास सफेद तांदळापेक्षा जास्त दर मिळत असल्याने कमी मेहनतीमध्ये चांगले उत्पन्न मिळवण्यात यश येत आहे.
ज्या शेतकर्यांना यंदा बियाणे मोफत उपलब्ध करून दिले आहे, त्यांनी उत्पादित भात पिकातून काही बियाणे इतर शेतकर्यांना पुढील वर्षीच्या लागवडीसाठी उपलब्ध करून द्यायचे आहे. यामुळे दरवर्षी लाल, काळया आणि जांभळ्या भात पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढणार आहे. उत्पादित भाताच्या मार्केटिंगसाठीही आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. यामुळे शेतीची उत्पादकताही वाढेल आणि शेतकर्यांचे उत्पन्नही वाढण्यास मदत होईल.
वंदना शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, रायगड