

अलिबाग : रमेश कांबळे
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणार्या शिधापत्रिकाधारकांची ई- केवायसी असणे शासनाने अनिवार्य केलेले आहे. लाभार्थ्यांचे शिधापत्रिकासोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे तसेच शिधापत्रिकेमध्ये नमूद असलेली व्यक्ती त्याच आहेत याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे.
मात्र जिल्हयातील शासनाच्या सेवा केंद्रांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सर्व्हर डाउन होत असल्याने ई-केवायसी करण्यात अडथळे येत आहेत. शिधापत्रिकांसोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांकाचे प्रमाणिकर पूर्ण करण्यासाठी व रास्तभाव दुकानस्तरावर ई-केवासयी मोहिम राबविण्यात येत आहे. शासनाचे निर्देशान्वये धान्याचा लाभ घेणार्या सर्व पात्र शिधा पत्रिकाधारकांची 100 टक्के ई-केवायसी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये 75.72 टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे.
शासनाच्या पुरवठा विभागामार्फत शिधापत्रिकाधारक लाभार्थी यांची ई-केवायसी करण्यासाठी शासनाने दिलेली मुदतवाढ 30 जून रोजी संपली आहे. मात्र अद्यापही ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली नाही, अशा सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याकरिता आणखी एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी आपली ई-केवायसी करण्यासाठी रास्तभाव धान्य दुकानामध्ये, तसेच शासनाच्या सेवा केंद्रांमध्ये जात आहेत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून शासनाचे सर्व्हर सातत्याने डाउन होत असल्याने ई- केवायसी करण्यात अडचणी येत आहेत.
ई-केवायसी तत्काळ पूर्ण करण्याचे आवाहन
याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी सांगितले की, सर्व्हर डाउन होत असल्याबाबत शासनाच्या संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे. लवकरच ही समस्या दूर होईल. संबंधित लाभार्थ्यांसाठी चशीर शघधउ हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन त्याद्वारेदेखील ई- केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी तत्काळ पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.