

अलिबाग / पुणे : मान्सून २३ पासून राजस्थान, हरियाणा आणि गुजरात राज्याच्या काही भागांतून परतीला निघाला आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात परतीचा पाऊस जोरदार सुरू झाला आहे. दरम्यान, बुधवारी (दि. २५) पुणे व रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. रायगडमध्ये परतीच्या पावसाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास जोरकस हजेरी लावली. विजांच्या कडकडाटांसह सुमारे तासभर पावसाच्या जोरदार सरी तासाभराहून अधिक काळ पडत होत्या.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी तासाभराहून अधिक काळ कोसळत राहिल्या.यामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला.त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली.दुपारी आकाश ढगाळलेले राहिले पण पाऊस काही पडला नाही. दरम्यान, बहरत आलेल्या भातशेतीला पावसाची गरज असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यंदाच्या मोसमात रायगडात पावसाने अपेक्षेपेक्षा जास्त हजेरी लावली आहे. गणेशोत्सव संपताच पावसाचा परतीचा प्रवासही सुरु झालेला आहे. २३ ते २९ सप्टेंबर या कालावधीत मोसमी पाऊस माघारी परतणार अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुसार गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर वाढला असल्याचे जाणवत आहेत.