

Duplicate Voters Raigad
सुवर्णा दिवेकर
अलिबाग : दुबार मतदारांवरून देशात रणकंदन वाजले असताना जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. रायगड जिल्हा परिषदेत ३६ हजार ५२८ मतदारांची नावे संभाव्य दुबार यादीत आली आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीतील नावांमध्ये पुनरावृत्ती झालेल्या नोंदी तपासून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीएलओंमार्फत तातडीने त्याची पडताळणी आली. त्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३६ हजार ५२८ दुबार नावे मतदार यादीत आढळली आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजल्याने स्थानिक पातळीवर राजकीय रणधुमाळी सुरू झाली असली, तरी मतदार यादीतील दुबार नावांचा ताण आहे. निवडणूक आयोगाने सर्व जिल्हा परिषदांमधील संभाव्य दुबार मतदारांची यादी पाठवली आहे. निवडणुकीपूर्वी त्यांची पडताळणी करून एकाच मतदारसंघात एकाच केंद्रावर त्यांनी मतदान करावे यासाठी यंत्रणा राबवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
यादी त्या त्या भागातील बीएलओंना दिली जाईल. बीएलओ गृहभेटीद्वारे मतदारांची पडताळणी करतील. त्यांना कोणत्याही एका मतदार संघातील, एका केंद्रावर मतदान करता येईल. तो मतदारसंघ आणि केंद्र कोणता असेल याची निवड मतदाराने करायची आहे. त्यानुसार मतदाराकडून तसा अर्ज भरून घेण्यात येणार आहे.
दोन किंवा त्यापेक्षा जास्त मतदारसंघात मतदार यादीत नाव असेल तर एका ठिकाणाची निवड.
एकाच मतदारसंघात दोन-तीन मतदान केंद्रांवर नाव असेल, तर एका केंद्राची निवड.
वरील दोन्ही पर्यायाला मतदाराकडून प्रतिसाद नसेल, तर मतदार यादीतील नावापुढे दुबारचा शिक्का. मतदार मतदानासाठी आला, तर तेथेच त्यांचे मी या केंद्रावर मतदान करत असून, अन्य केंद्रांवर मतदान करणार नाही असे हमी पत्र लिहून घेतले जाईल,
तालुका : संभाव्य दुबार मतदार
अलिबाग : २ हजार २८२
मुरुड : ८८२
पेण ; ६ हजार ६०६
पनवेल : ७ हजार १२६
उरण : ४ हजार ७५०
कर्जत : ३ हजार ९८
खालापूर : २८२
माणगाव : ३ हजार २२३
तळा : ४६५
रोहा : २ हजार ३७
सुधागड : ९८०
महाड : २ हजार ६५३
पोलादपूर : ८९०
श्रीवर्धन : ७१७
म्हसळा : ५३७