

अलिबाग : रायगड जिल्हा परीषदेतील सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचाली वाढत चालल्या असतानाच प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे. रायगड जिल्हा परीषदेच्या नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केला असून 12 मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक आयोजीत करण्यात आली आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता येणार याबाबत लागून राहिलेली प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.
12 मार्च रोजी दुपारी 2 वाजता अलिबाग येथील नियोजन भवनच्या सभागृहात नवनिर्वाचित जिल्हा परीषद सदस्यांची बैठक आयोजीत करण्यात आली असून याच बैठकीत नवीन जिल्हा परीषदेच्या नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे.
रायगड जिल्हा परीषदेची निवडणूक 7 फेब्रुवारी रोजी पार पडली त्यानंतर 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर झाले. जिल्हा परीषदेतील नवीन कारभारी कोण असतील याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे.
ग्रामविकास विभागाने या संदर्भात पत्रक काढून 20 मार्च पूर्वी जिल्हा परीषद सदस्यांची पहिली बैठक घेवून अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पूर्ण करावी असे आदेश संबंधित जिल्हाधिकारी यांना दिले होते. त्यानुसार आता रायगड जिल्हा परीषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक 12 मार्च रोजी होणार असून याच बैठकीत अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड होणार आहे.
12 मार्च रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र भरणे
दुपारी 2 वाजता अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक
बैठकीत आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी होईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेता येईल आणि गरज भासल्यास मतदान घेतले जाईल.
रायगड जिल्हा परीषदेत एकूण सदस्य संख्या 59 आहे. यावेळच्या निवडणूकीत शिवसेना शिंदे गटाचे 21, भाजपाचे 15, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 16, शिवसेना ठाकरे गटाचे 5 तर कॉंग्रेसचे 2 सदस्य निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेसाठी 30 हा बहुमताचा आकडा असून रायगड जिल्हा परीषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मिळून 31 सदस्य होतात. दोघे मिळून सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. यात भाजपकडे अध्यक्षपद तर उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचा असणार आहे. या सत्तेत शिवसेनेला सहभागी करून घ्यायचे की नाही याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही.
रायगड जिल्हयातील 15 पंचायत समितीच्या सभापती , उपसभापती निवडीचा कार्यक्रमदेखील जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडीसाठी 11 मार्च रोजी विशेष सभांचे आयोजन करण्यात आले आहे. यात निवड झालेल्या सभापतींना 12 मार्च रोजी होणारया जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेला उपस्थित राहता येणार आहे.