

रायगड: उन्हाचा कडाका वाढू लागल्याने रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या आता गंभीर रूप धारण करत आहे. रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 4 मे पर्यंत जिल्ह्यातील एकूण 42 गावे आणि 184 वाड्या, अशा एकूण 226 ठिकाणांना 50 खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टंचाईचा फटका जिल्ह्यातील तब्बल 80 हजार 091 लोकसंख्येला बसत आहे.
दरम्यान गतवर्षी म्हणजे 2025 मध्ये याच काळात जिल्ह्यातील 43 गावे आणि 242 वाड्या अशा एकुण 285 ठिकाणच्या एकुण 1 लाख 13 हजार 778 लोकसंख्येला पाणी टंचाईचा फटका बसला होता, त्यांना एकुण 42 खासगी टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात आला होता.
रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यात पाणी टंचाईची सर्वाधिक भीषण परिस्थिती आहे. पेण तालुक्यांतील 5 गावे आणि 64 वाड्यां अशा एकूण 69 ठिकाणी जिल्ह्यातील सर्वाधीक 19 हजार 129 पाणी टंचाईग्रस्त ग्रामस्थ असून त्यांना 12 खासगी टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
त्या खालोखाल महाड तालुक्यांतील 13 गावे आणि 70 वाड्यांसह सर्वाधिक 83 ठिकाणी 16 हजार 120 ग्रामस्थ पाणीटंचाईग्रस्त असून त्यांना 7 खासगी टँकर्स द्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
पनवेल तालुक्यांतील 5 गावे आणि 4 वाड्या अशा 9 ठिकाणी 14 हजार 248 ग्रामस्थ पाणीटंचाईग्रस्त असून त्यांना 8 खासगी टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग तालुक्यांत देखील चार गावांतील 8 हजार 782 ग्रामस्थ पाणी टंचाईग्रस्त असून त्यांना तीन खासगी टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा करावा लागत आहे. उरण तालुक्यांतील 4 वाड्यांतील 1351 ग्रामस्थांना एका टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
कर्जत तालुक्यांतील 3 गावे आणि 8 वाड्यांतील 5 हजार 494 ग्रामस्थांना 6 टॅकर्समधून पाणी देण्यात येत आहे. खालापूर तालुक्यांतील 4 गावे आणि 9 वाड्यांतील 6 हजार 588 ग्रामस्थांना 6 टँकर्सद्वारे पाणी पोहोचवले जात आहे. माणगांवमध्ये 4 गावे आणि 15 वाड्यांतील 5352 ग्रामस्थांना 5 टॅकर्सने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
पोलादपूर मधील 3 गाव व 7 वाड्यांतील 1401 ग्रामस्थांना एका टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.तर श्रीवर्धनमध्ये 1 गांव व 3 वाड्यांतील 1626 ग्रामस्थांना एका टँकरऩे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.