

खालापूर : तालुक्याचे ठिकाण असताना देखील पिण्याचे शुद्ध पाणी दूरच दैनंदिन वापरासाठी देखील पाणी वेळेवर मिळत नसल्याने खालापूर, शहरातील नागरिक वैतागले आहेत. पाणी न देता पाणी पट्टी वाढवणा-या नगरपंचायत प्रशासनाचा सत्कार नागरिक करणार आहेत. दुष्काळात तेरावा महिना अशी गत सध्या खालापूर शहरात आहे.
पर्यायी जल योजना पाताळगंगा नदीवर असून रसायन मिश्रित आणि मांगुर तलावाचे दुर्गंधीयुक्त पाणी नागरिक नाईलाजास्तव दैनंदिन कामासाठी वापरतात. परंतु पाताळगंगा नदीची पाणी पातळी कमी झाल्याने दैनंदिन वापराचे पाणी देखील चार ते पाच दिवस मिळत नाही.
नगरपंचायत खालापूर शहरासाठी नवीन जलवाहिनीचे सुरू झालेले काम आठ महिने ठप्प असून ठेकेदाराला कामाचा विसर पडल्याने नगरपंचायत प्रशासनाने आठवण करून द्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. सध्या पाच दिवसापासून खालापूरचा पाणीपुरवठा ठप्प झाला असून पिण्यासाठी जार मधील विकतचे पाणी वापरावे लागत आहे. तर दैनंदिन कामासाठी लागणा-या पाण्यासाठी नदी आणि विहिरीची वाट धरावी लागत आहे. खालापूर नागरिकांच्या पाणी टंचाई समस्येवर नगरपंचायत प्रशासन, सत्ताधारी नगरसेवक गांभीर्याने पाहत नसल्याने खालापूर नागरिक संतप्त आहेत.
पाणीपुरवठा सारख्या गंभीर प्रश्नावर नगरपंचायत गंभीर नाही .प्रशासन भ्रष्ट झालेले असून कोणाचा अंकुश नाही. एकीकडे भरमसाठ पाणीपट्टी वाढवायची आणि दुसरीकडे नागरिकांना पाणी आणण्यासाठी विहिरीवर पाठवायचे असा अजब प्रकार सुरू असुन अशी नगरपंचायत बरखास्त करा.
अॅड-राकेश गव्हाणकर
कलोते येथील जुनी पेयजल योजना गळतीमुळे सध्या बंद आहे. कलोते येथून नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यास नागरिकांची तहान भागणार आहे. पिण्याच्या पाण्याचे प्रचंड हाल होत आहेत. असे असताना देखील पाणीपट्टी दुप्पट करण्यात आली आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत नगरपंचायतन पाहत आहे. विकासकामाचा गाजावाजा करणा-या नगरपंचायतीचा जाहीर सत्कार नागरिक करणार आहेत.
नवीन तेवीस कोटीची पेयजल योजना खालापूर साठी मंजूर झालेली आहे. सोमवारी थांबलेले काम सुरू करण्यात येईल. तसेच पाताळगंगा नदिवर सुरू असलेल्या योजनेसाठी तातडीने नवीन पंप खरेदी करून थेट नदीपात्रातून पाणी उचलून विहित घेऊन पाणी पुरवठा करण्यासाठी सूचना देवू.
रोशना मोडवे, नगराध्यक्षा खालापूर नगरपंचायत