अलिबाग : पावसाळयाच्या दिवसांत अनेकदा गढूळ पाण्याचा पुरवठा ग्रामीण भागासह शहरी भागातही होत असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होते. यामुळेच जिल्हा परिषद स्वच्छता व पाणी मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्यांच्या योजनांच्या स्त्रोतांची जैविक तपासणी करण्यात आली.
जिल्ह्यातील एक हजार 830 गावांपैकी एक हजार 403 गावांची तपासणी करून चार हजार 43 ठिकाणी पाण्याचे नमुने तपासण्यात आले. या तपासणीत 23 गावांमधील 36 ठिकाणी पाण्याचे नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहे. याबाबत जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात पाऊस समाधानकारक पडल्यामुळे धरणे, विहीरी, पाण्याने तुडूंब भरली आहेत. रायगड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 28 धरणांपैकी सुतारवाडी, पाभरे, संदेरी, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, वरंध, कोंडगांव, उन्हेरे, कवेळे, भिलवले, वावा, फणसाड, घोटवडे, कोलतो- मोकाशी डोणवत या 16 धरणांमध्ये 100 टक्के जलसाठा आहे.
कार्ले, अवसरे, बामणोली, उसरण, या धरणांमध्ये 75 टक्के; कुडकी, आंबेघर या दोन धरणांमध्ये 99 टक्के आणि श्रीगांव, ढोकशेत, साळोख, मोरबे, पुनाडे, रानीवली या सहा धरणांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत जलसाठा उपलब्ध आहे. अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातही मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा आहे.
जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास, गाढी या नद्याही पाण्याने भरल्या आहेत. कोलाड येथील लघुपाट बंधारे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अखत्यारित असलेल्या धरणांमधून जिल्हयातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. धरणे पाण्याने भरल्याने पाणीही मुबलक मिळत आहे.
पाणी कपातीचे संकट दूर झाले आहे. मात्र, पावसामुळे धरणांमधील पाणी माती मिश्रीत व गढूळ झाले आहे. काही धरणांमध्ये जलशुद्धीकरण केंद्र असूनही नागरिकांना अशुद्ध पाणी मिळत आहेत. काही धरणांमध्ये जलशुध्दीकरण केंद्राचे काम अपूर्ण स्थितीत असल्याने पाणीशुध्दीकरणाची पावडर टाकून शुध्द पाणी देण्याचा प्रयत्न केला जातो. तरीदेखील नळा द्वारे येणारे पाणी हे गढूळ असल्याचे दिसून आले. त्यामुळे रायगकरांना गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे.
जिल्हा परिषद स्वच्छता व पाणी मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या योजनांच्या स्त्रोतांची जैविक तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील एक हजार 830 गावांपैकी एक हजार 403 गावांची तपासणी करून चार हजार 43 ठिकाणी पाण्याचे नमुने तपासण्यात आले. या तपासणीत 23 गावांमधील 36 ठिकाणी पाण्याचे नमुने दूषित असल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक दूषित पाणी पित असल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे.
जिल्ह्यातील 23 गावांमधील 36 ठिकाणी पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. या गावांतील दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार होऊ नये, म्हणून उपाययोजना करण्याच्या सुचना ग्रामपंचायतींना केल्या आहेत.
संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद