

उरण : महावितरणने उरणच्या पूर्व भागातील नागरिकांना अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी कोस्टल रोडवरून वीज वाहिन्या जोडनीचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या दहा दिवसात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती महवितरणचे कार्यकारी अभियंता विकास गायकवाड यांनी दिली.
उरणच्या पुर्व भागात खोपटा पुलावरून जाणारी वीज वाहनी ही भेंडखळ खाडीतुन टाकण्यात आली होती त्यामुळं ती नेहमी अडचणीची ठरली होती. मात्र आत्ता वीज वाहिन्या जिटीपीएस सबस्टेशन वरून करंजा कोस्टल रोडवरून बायपास करण्यात येणार असल्यामुळे पूर्व भागातील वीज खंडीत होण्याचे प्रमाण घटणार आहे. वीज वाहिन्यांची दुरूस्ती देखिल लवकर होणार आहे. त्यामुळे पुर्व भागातील कोप्रोली, खोपटा, पाणदिवे, पिरकोन, पाले, गोवठणे, आवरे कडापे, भंगारपाडा, सारडे, वशेणी, पुनाडे, आदिवासी वाड्या, मोठीजुई, कळंबूसरे, चिरनेर, मोठे भोम गावची वीजेची समस्या सुटणार आहे.
उरण पुर्व भागाला जीटीपीएस सबस्टेशनवरून वीज पुरवठा सुरू आहे. या करीता जीटीपीएस, भेंडखळ, नवघरवरून खोपटा पुलावरून वीज पुरवठा केला जातो. या वीज वाहिन्या भेंडखळ खाडीतून टाकण्यात आल्या असल्याने येथिल खाऱ्या वातावरणामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे या खाडीमध्ये नेहमी पोल पडून किंवा तारा तुटून वीज खंडीत होत असते. हा खाडीचा भाग दलदलीचा आणि पाण्याचा असल्यामुळे येथे दुरूस्ती करताना महावीतरणच्या अधिकाऱ्यांना आणि कामगारांना खूप अडचणी येतात. कधी-कधी छातीभर पाण्यातून किंवा होडीतून कर्मचाऱ्यांना या खाडीत उतरून काम करावे लागते त्यामुळे या दुरूस्तीच्या कामाला वेळही लागतो आणि हे काम धोकादायकही आणि खर्चिकही असते. आत्ता मात्र उरणच्या पुर्व भागातील नागरिकांसाठी नवीन वीज वाहिन्या टाकण्यात आल्या असून जीटीपीएस वरून द्रोणागिरी नोड वरून कोस्टल रोड मार्गे खोपटा पुलावरून वीजपुरवठा करण्यासाठीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 7 कि.मी. चे हे अंतर आहे. या बायपास वीज वाहिनींमुळे उरण पुर्व भागातील वीजेचा दाब देखिल कमी होणार आहे.
रानसई एमआयडीसी, जेएनपीटी आणि जासई फिडर वरील वीजेचा दाब कमी होणार आहे. त्यामुळे पुर्व भागातील कोप्रोली, खोपटा, पाणदिवे, पिरकोन, पाले, गोवठणे, आवरे कडापे, भंगार पाडा, सारडे, वशेणी, पुनाडे, आदिवासी वाड्या, मोठीजुई, कळंबूसरे, चिरनेर, मोठे भोम या गावातील नागरीकांना जास्त दाबाने वीज पुरवठा होणार असून येत्या दहा दिवसात हे काम पूर्ण होऊन काही कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर वीजपुरवठा सुरू केला जाणार आहे.