

उरण : राजकुमार भगत
सिडकोने रस्ता सुशोभित करण्यासाठी लावलेली नारळाची झाडे काही समाजकंटकानी जाळून टाकली आहेत. या आगीमुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या खारफुटीच्या झाडांना देखील झळ लागली असून असंख्य खारफुटीची झाडे होरपळली आहेत. यामुळे या समाजकंटकांच्या विरोधात निसर्गप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.सिडकोने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
उरण तालुक्यातील सिडकोने द्रोणागिरी नोड परिसरातील रस्त्यांवर विविध प्रकारची झाडे लावण्याचा संकल्प शासनाच्या माझी वसुंधरा ( झाडे लावा झाडे जगवा ) या माध्यमातून हाती घेतला आहे. त्या धर्तीवर सिडकोने पागोटे - भेंडखळ - करंजा बंदर या द्रोणागिरी नोड परिसरातील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या कोस्टल रस्त्यांवर जवळपास एक कोटी रुपये खर्च करून नारळाची झाडे लावली आहेत. या रस्त्याच्या बाजूली काही परप्रांतियांनी बेकायदेशीर झोपड्या बांधल्या आहेत. हीच लोक ही झाडे जाळून, खारफुटीवर भराव करून झोपड्या, टपर्या बांधतात आणि त्यामध्ये अवैध व्यवसाय करत असतात. याकडे सिडकोचे अधिकारी आणि वनविभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असतात अशी तक्रार स्थानिकांनी वारंवार केली आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ही झाडे जाळली गेल्याचे बोलले जाते.सिडकोने ही झाडे जाळणार्यांना शोधून कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.आधीच निसर्गाचे संवर्धन व्हावे यासाठी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि इकडे लावलेल्या झाडांना आगी लावल्या जात असल्याच्या घटना घडतात याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
ज्या ठिकाणी झाडे जळाली आहेत त्या ठिकाणी अधिकारी पाठवून पहाणी केली जाईल. जर ती मँग्रोव्हज सेलच्या अधिकाराखालील जागा असेल तर आमच्या विभागाकडून कारवाई केली जाईल. मात्र सिडको, महसूल किंवा जेएनपीएच्या अखत्यारीतील असेल तर ते कारवाई करतील.
समीर शिंदे, मँग्रोव्हज सेल
सिडकोने कोस्टल रोड सुशोभित करण्यासाठी करोडो रूपये खर्च करून नारळाची झाडे लावली आहेत. बर्यापैकी वाढलेली ही झाडे कोणीतरी अज्ञात इसमाने जाळून टाकली आहेत. यापुर्वी देखिल भेंडखळ खाडीजवळची शेकडो झाडे अज्ञाताने जाळली होती. त्यामुळे सिडकोने ही झाडे वाचविण्याची जबाबदारी देखिल घेतली पाहिजे.
विवेक केणी, निसर्ग मित्र, उरण
सिडकोने उरणला जोडणार द्रोणागिरी नोड ते पागोटे या पाच किलोमीटरच्या सागरी (कोस्टल) महामार्गावर जवळपास 1 कोटी रुपये खर्च करून 4 हजार नारळाच्या झाडांची लागवड केली आहे. सध्या कडक उन्हामुळे या झाडांना पाण्याची गरज असताना कोणीतरी समाज कंटकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या गवताला आग लावल्यामुळे सागरी महामार्गाच्या सौंदर्यात भर टाकणार्या अनेक नारळाची झाडे जळाली आहेत.