

म्हसळा: पुढारी वृत्तसेवा: तोंडसुरे (ता. म्हसळा) येथे ऐन उन्हाळ्यात व होळीच्या सणात पाणी मिळत नसल्याने गावात पाणीबाणीचे संकट निर्माण झाले आहे. परिणामी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थ आणि महिलांनी म्हसळा येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयावर आज (दि.१०) रिकामे हांडे घेऊन निषेध मोर्चा काढण्यात आला.
म्हसळा ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता जे. यु. फुलपगारे यांनी लेखी अश्वासन देऊन येत्या दोन दिवसांत पाणी पुरवठा केला जाईल. तर होळीच्या सणात टँकरने पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले आहे.
चार ग्रामपंचायती अंतर्गत आठ गावे आणि वाड्यांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत साडे तेरा कोटी रुपये खर्चाचे मंजूर असलेली तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे काम ठप्प झाले आहे. पाभरे धरण येथून पाणी पुरवठा होत असलेली जुनी नळ पाणीपुरवठा योजनेचे तीन तेरा वाजले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात व होळीच्या सणात तोंडसुरेसह वाड्यांमध्ये पाणीबाणीचे संकट निर्माण झाले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा चिटणीस तथा शिखर समिती अध्यक्ष महादेव पाटील, तोंडसुरे तिनवाडी अध्यक्ष वामन नाक्ती, सचिव सुदर्शन जंगम, सरपंच सुरेश महाडिक, उपसरपंच प्रिती पवार, प्रकाश लोणशीकर, गोपाळ भायदे, ग्राम पंचायत सदस्या शिला पवार, हरी नाक्ती, गजानन जंगम, अनिल जंगम, प्रशांत महाडिक, प्रकाश गाणेकर, समीर काळोखे, तोंडसुरे गावातील सर्व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांना तीन - चार किलोमीटर पायपीट करत पाणी आणावे लागत आहे. त्याचबरोबर पुरुष मंडळींना सुद्धा पाण्यासाठी भटकावे लागत आहे. प्रशासनाने आमची समस्या लक्षात घेऊन योग्य तो मार्ग काढावा. नाहीतर पुन्हा आम्हाला प्रशासनाचे विरोधात आक्रमक पावले उचलावी लागतील.
शिला पवार, उपसरपंच, तोंडसुरे
मोर्चामध्ये अनेक वयोवृद्ध नागरिक सहभागी झाले आहेत. प्रशासनाने आता तरी गांभीर्याने विचार करून आठ दिवसांत तोंडसुरे पाणीपुरवठा योजना सुरळीत करावी. अन्यथा आम्ही यापुढे अन्नत्याग उपोषण करणार आहोत. सर्व परिणामांना प्रशासन जबाबदार असेल.
सुदर्शन जंगम, सचिव - तोंडसुरे, तीन वाडी ग्रामस्थ मंडळ