

नागोठणे : नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील सुकेळी खिंडीतील ब्रिजखालील 90 फूट खोल कॅनलमध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. रविवार, 2 नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे 3 वाजता नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
घटना समजताच नागोठणे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कॅनलमध्ये उतरून पोलिसांनी सहकार्यांच्या मदतीने आणि क्रेनचा वापर करून मृतदेह वर काढला. त्यानंतर तो नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला.
तपासादरम्यान मृतदेहाच्या खिशात मिळालेल्या वस्तूंवरून त्याची ओळख प्रदीप गणपत देवरे (रा. चिकणी, पोस्ट पाटणसई, ता. रोहा, जि. रायगड) अशी पटली. याबाबत त्यांचे नातेवाईकांना सूचना देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिसांकडून सुरू आहे.