रायगड : श्रीवर्धन किनारपट्टीला असुरक्षिततेचा विळखा

1993 सारखी घटना पुन्हा घडू नये म्हणून सुरक्षेचा आराखडा तत्काळ होणे गरजेचे
श्रीवर्धन , रायगड
श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी बंदरावर उतरवले गेले होते, हे तपास यंत्रणांनी उघड केले. त्या घटनेनंतर श्रीवर्धन तालुक्याची किनारपट्टी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठरली Pudhari News Network
Published on
Updated on

श्रीवर्धन : भारत चोगले

12 मार्च 1993 - मुंबईत भीषण साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये सुमारे 257 नागरिकांचा बळी गेला होतो. शेकडो जण जखमी होत. या हल्ल्यांमध्ये वापरले गेलेले आरडीएक्स हे स्फोटक श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी बंदरावर उतरवले गेले होते, हे तपास यंत्रणांनी उघड केले. त्या घटनेनंतर श्रीवर्धन तालुक्याची किनारपट्टी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठरली होती.

तेव्हापासून किनारपट्टीवर सुरक्षा वाढविण्यात आली होती. महत्त्वाच्या फाट्यांवर चेकपोस्ट उभारण्यात आल्या होत्या. मात्र आज 30 वर्षांनंतर, इतिहास पुन्हा त्याच वाटेने पावले टाकतोय, असं दृश्य निर्माण झालं आहे. श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरिहरेश्वर, म्हसळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वांगणी, कोळे फाटा, साई फाटा आणि गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संदेरी-पंदेरी- हे सर्व रस्ते थेट मुंबई-गोवा महामार्गाशी जोडलेले आहेत. या भागांतून देशविघातक तत्त्वांना सहज हालचाल करता येऊ शकते. म्हणूनच 1993 नंतर येथे चेक पोस्ट उभारण्यात आल्या होते.

तेव्हा या चेक पोस्टवर 24 तास पोलीस कर्मचारी हजर राहत. तपासणी, ओळख पडताळणी, संशयित वाहतुकीवर लक्ष ठेवणे हे सारे काम काटेकोरपणे होत होते. मात्र आता या चौक्या बंद आहेत. एकट्या साई फाटा चेक पोस्ट कार्यरत असून बाकी सर्व चेक पोस्ट बंद अवस्थेत आहेत. बहुतेक चेक पोस्टवर पक्के बांधकामही करण्यात आले नव्हते. कालांतराने त्या मोडकळीस आल्या. भिंतींना तडे गेले आहेत, विजेचा पुरवठा खंडित आहे, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अनेक ठिकाणी चेक पोस्ट पूर्णपणे निष्क्रिय अवस्थेत आहेत.

काही चौक्यांवर सुरुवातीला नेमलेले कर्मचारी निवृत्त झाले, किंवा बदलीवर गेले, मात्र त्यांच्या जागी नवीन भरतीच झाली नाही. मनुष्यबळाची टंचाई ही गंभीर बाब ठरली आहे. श्रीवर्धन, दिवेआगर, शेखाडी, वेळास यांसारख्या मोक्याच्या किनार्‍यांवर परदेशी वस्तूंची तस्करी पूर्वीपासूनच सुरु होती. काही महिन्यांपूर्वी अमली पदार्थ किनार्‍यावर वाहून आले होते, यामुळे समुद्रमार्गे होणार्‍या घातक हालचालींचा धोका अजूनही कायम आहे हे स्पष्ट होते.

भारतीय नौदलाने रायगड जिल्ह्यातील 20 बंदरे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. यामध्ये श्रीवर्धन तालुक्याचे शेखाडी बंदर अग्रक्रमावर आहे. कारण 1993 मध्ये याच बंदरावर आरडीएक्स उतरवण्यात आले होते. गृहविभागाने या बंदरांवर सीसीटीव्ही, दिवे, सुरक्षा व्यवस्था उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र पोलिस विभाग पुरेसा निधी नसल्याचे कारण पुढे करतो आहे. हे कारण आता असंवेदनशील आणि अपुरं वाटत आहे. कारण सुरक्षिततेच्या बाबतीत निधीची अडचण हा हास्यास्पद मुद्दा ठरतो. जर कुठल्याही दहशतवादी संघटनेने 1993 सारखं कटकारस्थान रचलं, तर आजच्या परिस्थितीत त्याला थोपवण्याची यंत्रणा नाही, हे स्पष्ट आहे.

श्रीवर्धन, म्हसळा आणि गोरेगाव परिसरातील बंद चेक पोस्टवर आता हालचाल सुरू झाली आहे. रात्रपाळीतील अधिकारी आणि अंमलदार नियमित तपासणीसाठी उपस्थित राहतात. प्रत्येक चेक पोस्टवर टठ कोड स्कॅनिंगची यंत्रणा कार्यरत आहे, जे सुरक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणते. उडठ फंडिंगच्या माध्यमातून चेक पोस्ट नूतनीकरणासाठी प्रयत्न सुरु असून लवकरच इमारती आधुनिक स्वरूपात उभारण्यात येणार आहेत. सुरक्षा कवच अभियान अंतर्गत या ठिकाणी संशयितांवर लक्ष ठेवण्याची कारवाई नियमित राबवली जाते. स्थानिक प्रशासनाच्या सतत पाठपुराव्यामुळे सुरक्षा व्यवस्था बळकट होण्याची चिन्हे आहेत. या हालचालींमुळे तालुक्याची किनारपट्टी सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक सक्षम होणार आहे.

सवीता गर्जे, उपविभायीय पोलीस अधिकारी, श्रीवर्धन, रायगड.

हे सगळं असताना देखील वरिष्ठ पातळीवरून कोणतीही ठोस कृती अद्याप झालेली नाही. हा निष्काळजीपणा देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत घातक ठरू शकतो. ही फक्त श्रीवर्धनची बाब नाही, तर ही राष्ट्राच्या सुरक्षिततेची बाब आहे. जे 1993 मध्ये घडलं, तेच जर पुन्हा घडण्याची शक्यता असेल, तर त्यामागचा कोणताही कट कायद्याच्या चौकटीत उघडकीस आणणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी तातडीने पुढाकार घेऊन: बंद चेक पोस्ट सुरू करणे, मनुष्यबळाची भरती करणे, चेक पोस्टच्या सुविधा सुधारणे, बंदरांवर कडक नजर ठेवणे, सीसीटीव्ही, वॉच टॉवर व प्रकाशयोजना तत्काळ बसवणे ही पावले उचलणं हे राष्ट्रहितासाठी अत्यावश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news