

महाड: महाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना 9 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, १ जानेवारी रोजी सोमनाथ ओझर्डे त्यांचे सहकारी अक्षय भोसले आणि प्रतीक जगताप यांनी दमदाटी करीत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. या आरोपाखाली त्यांच्याविरुद्ध २ जानेवारी रोजी बहार शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती.
शनिवारी 17 जानेवारी रोजी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने झालेल्या सुनावणी दरम्यान सरपंच सोमनाथ ओझर्डे व त्यांच्या दोन सहकाऱ्यांची बाजू ऐकून घेत अटकपूर्व जामीनावर पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच 9 फेब्रुवारीपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. या जामिनाच्या मदतीपर्यंत सोमनाथ ओझर्डे अक्षय भोसले व प्रतीक जगताप या तिघांनाही अटकेपासून संरक्षण मिळाल्याचे या न्यायालयाच्या निकालाने स्पष्ट झाले आहे.