

अलिबाग : रायगड जिल्हयातील ग्रामपंचायत सरपंच पदांच्या सन 2025 ते 2030 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी मंगळवारी (15 जुलै) जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांमध्ये आरक्षण काढण्यात आले. जिल्हयात 810 ग्रामपंचायती असून त्यातील 400 हून अधिक ग्रामपंचायतींची सरपंच पदे ही महिलांसाठी आरक्षित झाली आहेत. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाची दोरी महिलांच्या हाती राहणार आहे.
अलिबाग तालुक्यातील 62 ग्रामपंचायतीमध्ये 2025- 2030 या कालावधीत थेट सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत करण्यात आली. अलिबाग तालुक्यातील 62 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 31 ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंच यांच्यासाठी आरक्षण निश्चित झाले आहे. त्यामुळे पन्नास टक्के स्थानिक स्वराज्य संस्थेवर महिलाराज येणार हे निश्चित झाले आहे. तर 33 जागा सर्वसाधारण म्हणजे खुला गटासाठी आरक्षित आहेत.
थेट सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे आदेशाने सोडत कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित केला होता. आरक्षण सोडत सुरुवातीस तहसीलदार विक्रम पाटील यांनी निवडणूक आयोगाने घालून दिलेले गाईडलाईन यांची माहिती दिली आणि यापुढे होणार्या सर्व निवडणुकीसाठी आता आरक्षण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले व ही सोडत केली. मयुरी महेंद्र महाडिक या बालिकेने चिठ्ठ्या उचलून हे आरक्षण निश्चित केले. सुरुवातीला अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 11, नागरिकांचा मागास प्रवर्ग 17, सर्वसाधारण वर्गासाठी 33 आरक्षित जागा निश्चित केल्या.
अलिबाग तालुक्यातील 62 ग्रामपंचायतींमधील 31 ग्रामपंचायत या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अनुसूचित जमाती 1, अनुसूचित जमाती 6, नागरिकांचा मागास प्रवर्ग 8, सर्वसाधारण 16 अशा 31 ग्रामपंचायतीमधील महिला आरक्षण यांची सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातीसाठी आंबेपूर, अनुसूचित जमाती महिला राखीव मध्ये, कावीर, चिंचोटी, पेंढाबे, ढवर, मानकुळे, मान तर्फे झिराड तर अनुसूचित जमाती खुल्या गटासाठी आवास, नागाव, वेजाळी, पेझारी, शहापूर यांची निवड करण्यात आली. नागरिकांचा मागास प्रवर्ग गटासाठी 8 महिला आरक्षित करण्यात आल्या. त्यामध्ये नवगाव, खंडाळे, शहाबाज, कुरकुंडी कोलटेंभी,खानाव, कुर्डूस, रेवदंडा, आक्षी तर नागरिकांचा मागास प्रवर्ग खुल्या गटात सातीर्जे, वाडगाव, बामण गाव, चिंचवली, मुळे, रेवस, आगरसुरे, कामार्ले, बेलोशी यांचा समावेश होता.
सर्वसाधारण गटातून 16 महिला आरक्षित करण्यात आल्या. त्यामध्ये झिराड, चेंढरे, थळ, किहिम, मापगाव, वेश्वी, वाघोडे, शिरवली, चौल, रांजणखार डावली, नारंगी, सासवणे, कुसुंबळे, परहूर, खिडकी, रामराज तर सर्वसाधारण खुल्या गटासाठी बेलकडे, कुरूळ, सहाण , धोकवडे, बोरीस, मिळकतखार, सारळ, सु, बोरघर, पोयनाड, वाघ्रण, वरंडे, ताडवागळे, कोप्रोली, श्रीगाव ,चरी, वरसोली या ग्रामपंचायतीचे आरक्षण निश्चित करण्यात आले. ही आरक्षण सोडत प्रक्रिया तहसीलदार विक्रम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी नायब तहसीलदार संदीप जाधव, अजित टोळकर व इतर कर्मचारी तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामसेवक व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अलिबाग तालुक्यातील 62 ग्रामपंचायतीमधील 31 ग्रामपंचायत या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. त्यामध्ये अनुसूचित जमाती 1, अनुसूचित जमाती 6, नागरिकांचा मागास प्रवर्ग 8, सर्वसाधारण 16 अशा 31 ग्रामपंचायतमधील महिला आरक्षण यांची सोडत काढण्यात आली.