

रायगड : ऑनलाइन फसवणुकीतील महत्त्वाचा दुवा ठरलेल्या 'म्युल अकाउंट' धारकांविरोधात रायगड जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 35 कोटी 30 लाख 97 हजार 766 रुपयांच्या संशयित सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत 23 गुन्हे दाखल करण्यात आले असून, रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर विभाग आणि स्थानिक पोलीस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शेअर बाजारात भरघोस परतावा, पार्ट-टाईम नोकरी, 'डिजिटल अरेस्ट' तसेच एपीक फाईल्सच्या माध्यमातून सायबर भामटे नागरिकांना जाळ्यात ओढत होते. त्यानंतर कमिशनचे आमिष दाखवून त्यांच्या नावाने बचत किंवा चालू बँक खाती उघडली जात होती.
खाते उघडल्यानंतर संबंधित व्यक्तींचे पासबुक, एटीएम कार्ड, चेकबुक आणि सिमकार्ड स्वतःकडे ठेवून या खात्यांचा वापर सायबर फसवणुकीतून मिळालेली कोट्यवधी रुपयांची रक्कम वळविण्यासाठी केला जात होता. राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टल (NCCRP) आणि समन्वय पोर्टलवरील तक्रारींचे विश्लेषण केल्यानंतर या संशयित व्यवहारांचा पर्दाफाश झाला.
या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार 24 जुलै 2026 रोजी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. न्यायालयाने त्याला 29 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून संबंधित म्युल अकाउंट्सची बँक स्टेटमेंट्स तपासली जात असून, या व्यवहारांचे इतर जिल्हे व राज्यांतील सायबर गुन्ह्यांशी संबंध आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.
या कारवाईअंतर्गत रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत 23 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये सायबर पोलीस ठाण्यात 10 गुन्हे, खोपोली येथे 23.60 कोटींच्या अपहाराचा एक गुन्हा, अलिबाग येथे 5.48 कोटींच्या फसवणुकीचा एक गुन्हा, तसेच कर्जत, पेण, पोयनाड, कोलाड, रोहा, नागोठणे, रसायनी, माणगाव आणि श्रीवर्धन या ठिकाणीही गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
रायगड पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही आमिषाला बळी पडून आपली बँक खाती, एटीएम कार्ड, ओळखपत्रे, फोटो किंवा सिमकार्ड अनोळखी व्यक्तींच्या ताब्यात देऊ नयेत, असे आवाहन केले आहे. तसेच, एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्याचा वापर सायबर गुन्ह्यासाठी झाल्याचे आढळल्यास संबंधित खातेदारालाही थेट आरोपी मानून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.