Raigad road accident : रायगडमध्ये पाच महिन्यांत रस्ते अपघातात 120 बळी

जानेवारी ते मे दरम्यान जिल्हयात 275 अपघातांची नोंद; वाढत्या वेगामुळे अपघात; दुचाकींचे अपघात अधिक
Raigad road accident
रायगडमध्ये पाच महिन्यांत रस्ते अपघातात 120 बळीpudhari photo
Published on
Updated on
रायगड ः किशोर सुद

रायगड जिल्ह्यातील महामार्ग, राज्यासह अंतर्गत रस्त्यामुळे सुधारणा होत असून वाहनांना वेग दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या वेगाचे भान वाहनचालकांना राहत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. रायगड पोलीस क्षेत्राच्या हद्दीत गेल्या पाच महिन्यांत 275 अपघात झाले आहेत. त्यात 120 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातांतील मृत्यूंमध्ये तरुण आणि घरातील कर्त्या व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. तर 286 जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृत्यू आणि कायमचे जायबंदी झाल्याने गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचा आधारच हरवला आहे.

रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे. जिल्ह्यात औद्योगिकीकरणदेखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरीकरणदेखील वाढू लागले आहे. जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यांसह कोकणातील पर्यटनस्थळी येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शनिवार व रविवारी तसेच अन्य सुट्टीच्या दिवशी अलिबागसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या पर्यटनस्थळी पर्यटक फिरण्यास येतात. कोकणातही पर्यटक फिरण्यासाठी जातात. त्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. काही वाहन चालक निश्चित स्थळी लवकर पोहोचण्याच्या नादात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात त्यामुळे अपघात होण्याची भीती अधिक असते.

मुंबई-गोवा महामार्गासह मुंबई-पुणे द्रुतगती राष्ट्रीय महामार्गावरील काही वळणांच्या ठिकाणी बेदरकारपणे वाहने चालविल्याने अपघात होऊन काहींना जीव गमवावा लागला असून, काहींना जखमी होऊन कायमचे अपंगत्व आले आहे. जिल्ह्यातील अपघात रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाते.

ज्या ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र आहे, त्या अगोदरच फलक लावून वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन केले जाते. ठिकठिकाणी वाहतुकीचे दहा सुवर्ण नियम फलकाद्वारे लावून वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो रायगड जिल्ह्यामध्ये 44 ब्लॅक स्पॉट (अपघात प्रवण क्षेत्र) आहेत.

रस्त्याच्या विशिष्ट भागात वारंवार अपघात होत असल्यास किंवा तीन वर्षांत एकाच ठिकाणी पाच-दहा अपघात झाले, तर ती जागा ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केली जाते. यानंतर या ठिकाणचे तज्ज्ञांचे पथक अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर सूचना देऊन ही जागा सुरक्षित कशी करता येईल, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना करतात. जिल्ह्यातील अपघात रोखण्यासाठी ब्लॅक स्पॉटची माहिती चालकांना दिली जात आहे.

गेल्या पाच महिन्यांतील अपघात

जानेवारी 2025 ते 31 मे 2025 दरम्यान एकूण 275 अपघात झाले आहेत. त्यात फेटल अपघात 102 असून 120 जणांचा मृत्यू झाला आहे. गंभीर जखमीचे अपघात 98 आहेत. त्यात 258 गंभीर जखमी तर किरकोळ अपघात 28 असून त्यात 51 जणांना दुखापती झाल्या आहे. 47 अपघातांमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही.

या ठिकाणी होतात अपघात

जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हे प्रमुख रस्ते जिल्ह्यातून जातात. याखेरीज खंडाळा घाट, बोरघाट, कशेडी घाट, आंबेनळी घाट हे प्रमुख धोकादायक आणि अपघात प्रवण घाटत आहेत. या ठिकाणी सातत्याने अपघात होत असतात. वडखळ-अलिबागमार्गावरील तिनविरा, राज्यमार्ग असलेल्या कर्जत चारफाटा, दासगाव येथे अपघात होतात. तर मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा पूल, खरोशी फाटा, तरणखोप, रामवाडी, वाशी फाटा, उचेडे, डोलवी, गडब, कासू, आमटेम, पेण फाटा ते अंगार आळी, सुकेळी खिंड, तळवली, पुई, मुगवली, कशेणे, ढालघर, तिलोरे, रेपोली, लोणेरे, टेमपाले, तळेगाव, गोरेगाव बस स्थानकाच्या 500 मीटरमधील, लोणेरे बसस्थानकाच्या 200 मीटरमध्ये, टेमपाले ते लाखपाले ते पेहेल, गांधारपाले, वीर, वीर फाटा, चोळई, धामणदेवी, लोहारे, पार्ले येथे तर मुंबई-पुणे एन.एच. 4 वरील खोपोली एक्झीट पॉईंट, अंडा पॉईंट खोपोली, कलोते, लोधीवली, आणि द्रुतगती मार्गावरील ढेकू गाव-खोपोली, आढोसी गाव-खोपोली, माडप बोगदा ते लोधीवली, पानशिल, रिसवाडी येथे अपघातांचे प्रमाण अधिक आहे.

अपघात होऊ नये यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फलक लावून वाहनांचा वेग कमी करण्याबरोबरच नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या जात आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात वाहतूक पोलिसांद्वारे कारवाई केली जात आहे. महामार्गावरून प्रवास करताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सोमनाथ लांडे, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, रायगड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news