अलिबाग : शिधापत्रिका ई केवायसी करण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही रायगड जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांकडून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात उदासीनता दाखवण्यात येत आहे. यात सर्वाधिक प्रमाण नोकरी करण्यासाठी दुसर्या जिल्ह्यात गेलेल्या चाकरमानी कुटुंबीयांचे आहे.
रायगड जिल्ह्यात आतापर्यंत फक्त 69.53 टक्केच ई-केवायसी पूर्ण झाली असून, ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा 30 जूनची मुदत देण्यात आली होती. यादरम्यान ई-केवायसी न झाल्यास शिधापुरवठा बंद होऊ शकतो, अशा सूचना जिल्हा पुरवठा विभागाने दिल्या आहेत. अद्याप जिल्ह्यात सुमारे 30 टक्के शिधापत्रिकांची ई-केवायसी होणे बाकी आहे.
शिधा वितरणात सुसूत्रता आणण्यासाठी शिधापत्रिका ई-केवायसीद्वारे आधार कार्ड संलग्न करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. दक्षिण रायगडमधील बहुतांश नागरिक नोकरी-व्यवसायासाठी स्थलांतरित झाले आहेत. काही जणांकडून गावाकडे येऊन ई-केवायसी करण्यास वेळ मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
वारंवार मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा एकदा मुदत देण्यात आली. या मुदतीत लाभार्थ्यांनी जवळच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये अथवा कॅम्पमध्ये जाऊन आपल्या अंगठ्याचा ठसा व आधार क्रमांक देऊन ई-केवायसी करावी. ई-केवायसी करण्यासाठी आतापर्यंत अनेकदा शिबिरांचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर याकरिता शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करता येते. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण 85 टक्क्यांच्या आसपास आहे, परंतु रायगडमध्ये शिधापत्रिकाधारक ई-केवायसीबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
अलिबाग - 68.91
कर्जत - 78.57
खालापूर - 73.45
महाड - 67.49
माणगाव - 67.78
म्हसळा - 62.52
मुरूड - 70.97
पनवेल - 63.80
पेण - 81.89
पोलादपूर - 54.80
रोहा - 60.59
श्रीवर्धन - 64.76
सुधागड - 63.59
तळा - 72.73
उरण - 77.18
शिधापत्रिकेला आधार कार्ड लिंक करून ई-केवायसी करणे गरजेचे आहे. यातून शिधापुरवठा करण्यात सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पुरवठा विभागाकडून वारंवार शिबिरे आयोजित करण्यात आली होती, परंतु जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून यास कमी प्रतिसाद मिळत आहे.
सर्जेराव सोनावणे, जिल्हा पुरवठा अधिकारी