

पनवेल : जागतिक स्तरावर धोक्यात आलेल्या प्रजातींच्या लाल यादीत समाविष्ट असलेल्या कोटेड ओटर्स अर्थात पाणमांजरांचे वास्तव्य रायगड जिल्ह्यातील माणगांव मधील काळ नदीनंतर आता खारघर मधील कांदळवन क्षेत्रा जवळील पाणथळ क्षेत्रात दिसून आले आहे. खारघर येथील पाणथळ जागी आयआयटी पवई येथे भूविज्ञान विषयात पी.एडी.करित असलेले प्राणी अभ्यासक तरंग सरीन यांना शनिवारी (दि.30 नोव्हेंबर) संध्याकाळी या पाणमांजरांचे दर्शन झाल्यावर त्यांनी तत्काळ त्याची छायाचित्रे घेऊन आपल्याकडे नोंद केली आहे.
खारघर येथील रहिवासी असलेले तरंग सरीन यांना शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सूर्यास्ताच्या वेळी खारघर सेक्टर 16 मधील वास्तुविहार सोसायटीजवळच्या कांदळवन क्षेत्रा शेजारील पाणथळ जागी दोन पाणमांजरे जलविहार करताना दिसून आली. ही दोन्ही पाणमांजरे प्रथम पाण्याबाहेर जमीनीवर होती, चाहूल लागताच ती दोन्ही पाणमांजरे पाण्यात गेल्याचे तरंग सरीन यांनी सांगीतले.
माणगावमधील काळनदीत या पाणमांजरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे.तेथील पाणमांजरांच्या नोंदी प्राणीपक्षी अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी करुन ठेवल्या आहेत. आता या पाणमांजरांचे वास्तव्य खारघरच्या पानथळ जागी दिसून आल्याने येथील जैवविविधता समृद्धीवर अनाहूतपणे शिक्कामोर्तब झाले आहे.
खारघर मध्ये आढळून आलेल्या पाणमांजरांच्या वास्तव्यामुळे येथील जैवविविधतेच्या समृद्धतेवर एका अर्थाने शिक्कोमार्तब झाले आहे. पाणमांजरे ही स्वच्छ आणि प्रदूषण नसलेल्याच जलाशयात वास्तव्य करतात. परिणामी येथील त्याचे वास्तव्य खारघर मधील ही पाणथळ जागा प्रदूषणमुक्त आणि धोका विरहीत आहे असे आज स्पष्ट झाले आहे. दरम्यान येथे असलेली ही दोन पाणमांजरे ही नर व मादी असण्याचीच शक्यता अधिक आहे. परिणामी प्रजोत्पादनाच्या दृष्टीने सुरक्षीत जागा म्हणून ही पाणमांजरांची जोडी येथे वास्तव्यास असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी या पाणथळ जागा संबंधीत प्रशासन आणि वन विभागाच्या कांदळवन संरक्षण कक्षाने संरक्षीत करण्याकरिता सत्वर नियोजन करणे गरजेचे आहे,अशा अपेक्षा तरंग सरीन यांनी व्यक्त केली आहे.