

रायगड : हवामान विभागाने रायगड जिल्हयाला सोमवारसाठी पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला होता. महाड, पोलादपूर आणि माणगाव तालुक्यातील शाळांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली होती. मात्र सोमवारी बहुतांश तालुक्यात पावसाचा जोर कमी राहिला. त्यामुळे अतिवृष्टीच्या छायेखाली असलेल्या रायगडकरांनी सुस्कारा सोडला..
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी सोमवारसाठी पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला होता. त्यामुळे जिल्हयात काही ठिकाणी २०० मि.मी. पेक्षा पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले होते. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महाड, पोलादपूर आणि माणगावातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र जिल्हयात रेडअलर्ट प्रमाणे पाऊस झाला नाही. सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात सर्वाधिक पाऊस महाड तालुक्यात १९३ मि.मी. झाला होता. सुधागड १४८ मि.मी., तळा ८६, रोहा ९८, माणगाव १४१, कर्जत व पनवेल ११५, पेण ८७, मुरुड ६३, उरण ८०, खालापूर १५४, म्हसळा ८५, श्रीवर्धन १२३, माथेरान १२० मि.मी. तर महाड, पोलादपूर आणि माणगावमध्ये ७५ ते १०० मि.मी. पर्यंत नोंद झाली होती.
गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसाने जिल्हयात ४८ कच्च्या घरांचे अंशत, ७ पक्क्या घरांचे अंशत, ३ पक्क्या घरांचे पूर्णत नुकसान झाले आहे. ८ गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. तसेच एका पाण्याच्या टाकीचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त आणि दरडग्रस्ता भागातील १४७ कुटुंबातील ४७५ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.