

पोलादपूर : तालुक्यातील नाणेघोळ (सोनारवाडी) येथे जमिनीला मोठ्या प्रमाणात चिरा पडल्याने भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत ३३ कुटुंबांतील एकूण ६९ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले.
घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन तसेच स्थानिक पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरडग्रस्त नागरिकांना बाळकृष्ण पंडित व वर्षा हरिश्चंद्र पाटणकर यांच्या निवासस्थानी तात्पुरत्या स्वरूपात विस्थापित करण्यात आले आहे.
विस्थापित नागरिकांची संख्या पुढीलप्रमाणे :
एकूण कुटुंबे : ३३
पुरुष : ३२
स्त्रिया : ३१
मुले : ६
एकूण विस्थापित : ६९
घटनास्थळी पंचायत समिती सदस्य निलेश कुंभार, तालुका प्रमुख निलेश अहिरे, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी, ग्रामसेविका गंभीरे मॅडम, तलाठी, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच स्थानिक पक्षांचे पदाधिकारी यांनी भेट देऊन स्थलांतरित नागरिकांच्या निवास, अन्न व इतर आवश्यक सुविधांची पाहणी केली. नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.