Raigad Rain Update | मुसळधार पावसाने कळंबोली जलमय

नालेसफाईचा फज्जा; पाणी खेचणारे मोटरपंप बंद, नागरिकांचे लाखोंचे नुकसान

Kalamboli waterlogged by heavy rain
मुसळधार पावसाने कळंबोली जलमयpudhari photo

कळंबोली ः दीपक घोसाळकर

अनेक दिवसाच्या प्रतीक्षा नंतर मान्सून सक्रिय झाल्याने धो धो कोसळणार्‍या पावसाने रविवारी कळंबोलीकरांची त्रेधातिरपीट उडाली. मुसळधार पावसाच्या रेट्याने कळंबोलीत सर्वत्रच पाणी साचून कळंबोली वसाहत पूर्णतः जलमय झाली. कळंबोलीत साचलेले पाणी खेचण्यासाठी बसवण्यात आलेले मोटर पंप हे सकाळपर्यंत बंद राहिल्याने त्याचा फटका संपूर्ण वसाहतीला बसला. महापालिकेकडून करण्यात आलेले नालेसफाईचा पुरता फज्जा उडाल्याने नागरिकांचे पुरते बेहाल झाले.

लाखो रहिवासियांना फटका

ऐन पावसाळ्यात नाल्यांची कामे काढून ठेवल्याने त्याचाही फटका कळंबोली जलमय होण्यास कारणीभूत ठरला. पूर्ण वसाहतच जलमय झाल्याने त्याचा फटका लाखो रहिवाशांना बसला असून त्याची नुकसान भरपाई कोण देणार असा आर्त सवाल कळंबोलीकर करत आहेत. रविवारी रात्रभर कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे कळंबोली वसाहत पूर्णतः जलमय झाली. वसाहती मधील साचलेले पाणी खेचण्यासाठी बसवण्यात आलेले सिंग हॉस्पिटल जवळील पंप हे रात्रभर बंद राहिल्याने पाणी कळंबोली वसाहतीत पूर्णता साचले. तीन ते साडेतीन फूट उंचीपर्यंत पाणी साचल्याने अनेकांच्या घरातही पाणी शिरले. एलआयजी भागातील नागरिकांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे घबराटीचे वातावरणही निर्माण झाले. रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या मोटरसायकल व चारचाकी वाहनेही पाण्यात बुडाल्याने त्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेकांनी आपल्या रिक्षा व दुचाकी सुरक्षित स्थळी नागरिकांना झालेल्या या त्रासाचे मात्र देणे घेणे ना सिडकोला ना महापालिकेला.

नालेसफाई फोल ठरल्याचा आरोप

कळंबोलीतील सप्तशृंगी माता मंदिर, विठ्ठल रुक्माई मंदिर, सेंट जोसेफ हायस्कूल परिसर, कार्मेल हायस्कूल, करांवली नाका, सुधागड हायस्कूल, स्टेट बँक जवळील भाग हा सर्व जलमय झाला. त्यातच ऐन पावसाळ्यात नाल्यांच्या दुरुस्तीचे काम काढून ठेवल्याने नाल्यांकडे येणारे पाणी बंद झाल्याने त्याचाही फटका कळंबोली जलमय होण्यास कारणीभूत ठरला. भर पावसातही महापालिकेची नाले सफाई चे काम आजही सुरू आहे. त्यामुळे नालेसफाई कितपत झाली याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. केलेली नालेसफाई फोल ठरल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून ही तर नालेसफाई नसून तिजोरीची सफाई असल्याचा आक्रोश नागरिकांनी व्यक्त केला. सकाळी येथील माजी नगरसेवक विजय खानावकर, सतीश पाटील यांनी सिंग हॉस्पिटल जवळ धाव घेऊन मोटर पंप सुरू करण्यास मदत केली. त्यामुळे पाण्याचा निचरा नंतर होऊ लागला. संध्याकाळपर्यर्ंत कळंबोलीत साचलेल्या पाण्याचा निचरा झालेला नव्हता. यातच पावसाच्या रेट्याने कळंबोलीतील शिवसेना शाखेजवळ एक मोठे झाड उभ्या असलेल्या गाडीवर पडल्याने मोठे नुकसान झाले. मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून कोसळलेले झाड त्वरित कापून बाजूला करून रस्ता मोकळा करून घेतला.

मुसळधार व अचानक वाढलेल्या पावसाच्या बरसण्याने कळंबोलीत पाणी साचले आहे. पाणी खेचण्यासाठी बसवण्यात आलेले पंप हे सिडकोच्या माध्यमातून कार्यान्वित असून ते सुरूही आहेत. तरीसुद्धा महापालिका प्रशासन पाण्याचा निपटारा करण्यासाठी सज्ज असून नागरिकांना अधिकाधिक सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- डॉ. वैभव विधाते, उपायुक्त पनवेल महापालिका.

कळंबोली वसाहतीमध्ये दरवर्षी पाणी साठवून नागरिकांना त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे, याची कल्पना सिडको व महापालिका प्रशासनाला असून सुद्धा बेजबाबदारपणे वागणार्‍या सिडको व महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई ही दिली पाहिजे.

श्री सतीश मोहन पाटील , माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हाध्यक्ष.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news