Raigad Rain Update | भरावांमुळे नागरी वस्तीत पूरस्थिती

जिल्ह्यातील शेकडो घरांमध्ये घुसले पावसाचे पाणी
Raigad Rain Update
भरावांमुळे नागरी वस्तीत पूरस्थिती (छाया : रमेश कांबळे)
Published on
Updated on

रायगड ः रायगड जिल्ह्यात रविवार आणि सोमवार या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याने रहिवासी भागांना तडाखा दिला आहे. दोन दिवसात जिलह्यातील शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले आहे. पाणी घरांमध्ये घुसल्याने किमती साहित्य, वाहने पाण्याखाली जाऊन नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात विविध प्रकल्पांसाठी होणारा भराव, नैसर्गिक नाले बंद होणे यामुळे पावसाच्या पाण्याचे प्रवाह अडविले जात आहेत. रविवार व सोमवारी झालेल्या अतिमुसळधार पावसानंतर पावसाचे पाणी शेकडो घरांमध्ये घुसल्याने मोठी वित्तहानी झाली आहे.

रायगड जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग अशा मोठ्या प्रकल्पांची कामे सध्या सुरु आहेत. तर गृहप्रकल्प व इतर प्रकल्पांची कामे सुरु आहेत. या प्रकल्पांच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात खाड्यांमध्ये भराव होऊन नैसर्गिकरित्या पाणी निचरा होण्याचे मार्ग बंद होत आहेत. नवनवीन गृहप्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात भराव केला जात आहे. तर बांधकाम ठिकाणी निर्माण होणारे डेब्रिजही रस्त्याकडेला, खाडी किनारी, नाल्यांमध्ये टाकले जात आहे. काही ठिकाणी नैसर्गिक नाल्यावरच बांधकाम झाल्याचे सांगितले जाते. शेती नापिकी करून तेथे भराव होत आहेत. नैसर्गिक व मानवनिर्मित पाण्याच्या प्रवाहांच्या मार्गावर भराव वाढत चालले आहेत.

Raigad Rain Update
Raigad Rain Update | मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपले

जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत त्यांची कचराभूमी नसल्याने हा कचरा अस्ताव्यस्त पसरून नद्या, खाड्यांमध्ये जात आहे. या कचर्‍यामध्ये प्लास्टीक विपुलप्रमाणात असते. हे प्लास्टीक पाण्याच्या प्रवाहात बाधा निर्माण करीत आहे. जिल्हयाच्या खाडी किनारी, नद्यांमध्ये कचराभूमीचा कचरा जात आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होत आहे. नदी, खाड्या आणि नाल्यांमध्ये साचणारा कचरा, भराव याचा वेळेवर उपसला केला जात नाही. नदी, खाड्या आणि नाल्यांमध्ये साचणारा भराव हा वेळीच साफ करण्याची आवश्यकता आहे. साफसफाई न झाल्याने नदी, नाल्यांमधील भराव, कचरा पावसाळ्यात आपत्तीला निमंत्रण देत आहे. याचे प्रत्यंतर यावर्षीच्या पावसाळ्यात आले आहे.

रविवार (7 जुलै) आणि सोमवारी (8 जुलै) रोजी रायगड जिल्हयात मुसळधार पाऊसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. अलिबाग, मुरुड, म्हसळा, पनवेल, महाड आदी तालुक्यात मोठा पाऊस झाला आहे. या पावसाने जिल्हयातील नदी, धरण, तलावांची पातळी वाढली आहे. जिल्हयातील काही नद्यांना पूरही आला आहे, मात्र या पावसाने सर्वाधिक नुकसान केले आहे ते नागरी वसाहती, शेती आणि काही ठिकाणी औद्योगिक वसाहतीचे. पनवेल तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी शिरले तर तळोजा येथील औद्योगिक वसाहतीतही पावसाच्या पाण्याने कारखानदारांना फटका दिला आहे. रहिवासी भागातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे आता महसूल विभागाने सुरु केले आहेत.

अलिबाग तालुक्यात 40 घरांत पाणी

अलिबाग तालुक्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. ढगफुटी सदृष्य पावसामुळे अनेक ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली. रामराज परिसरात मध्यरात्री तुफान पाऊस पडून पूर आला. तर काही घरांमध्ये पाणी शिरले होते. अलिबाग शहरातील रामनाथ तळकरनगर, पीएनपी नगर, मुळे गाव, पोयनाड आणि पेझारी येथील रस्त्यांवर पाणी आले. मुशेत गावातही पाणी घुसले होते. या श्रीगाव, राजमळा, नागाव येथेही पाणी शिरले होते. अलिबाग-रोहा, बोरघर-उमटे मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद होती. अलिबाग तालुक्यातील नदी किनार्‍यावरील गावांना अधिक फटका बसला असून 30 ते 35 घरांमध्ये पावसाच्या पाण्याने नुकसान झाले आहे.

उधाणानेही अडविले पाणी

सध्या उधाणाची मोठी भरती सुरु आहे. मुसळधार पडलेल्या पावसाचे पाणी निचरा होत असताना उधाणाच्या भरतीने त्या पाण्याचा वेग कमी केला. त्यामुळे किनारपट्टी भागात पाण्याची पातळी वाढल्याचे सांगितले जाते. दरम्यान, कोकण किनारपट्टीवर यावर्षी पावसाळ्यात 22 दिवस समुद्राला उधाणाची भरती येणार आहे. जूननंतर आता आगामी काळात जुलै महिन्यात 22 ते 25, ऑगस्ट महिन्यात 19 ते 23, सप्टेंबर महिन्यात 17 ते 22 या दिवशी समुद्राला मोठी भरती येणार आहेत. त्यामुळे या काळात साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. या काळातही पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news