

रायगड : हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशार्यामुळे रायगड प्रशासनाने सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. माणगाव, पोलादपूर, महाड आणि कर्जतमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. जिल्ह्यात मात्र सोमवारी पावसाची संततधार सुरु असून, पोलादपूर आणि माथेरान येथे ऑरेंज अलर्टचा पाऊस झाला मात्र उर्वरित तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी राहिले.
दरम्यान संध्याकाळी कुंडलिका नदिने इशारा जलपातळी ओलांडली असून दोन्ही किनारी सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यातील 28 पैकी 22 धरणे 100 टक्के भरली असून जिल्ह्याच्या सर्वसाधारण पर्जन्यमानाच्या 65 टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. या वर्षीच्या पावसाळ्यात जोरदार पावसाचे सातत्य दिसून येत आहे. हवामान विभागाकडून पावसाचा कधी यलो, कधी ऑरेंज तर कधी रेड अलर्ट दिला जात आहे.
त्यामुळे जिल्ह्यात काही भागात जोरदार व अतिजोरदार पावसाच्या सरी होत आहेत. जिलह्यातील अलिबाग तालुक्यात सरासरीच्या ९० टक्के, मुरुड तालुक्यात ८० टक्के आतापर्यंत पाऊस झाला आहे. तर कर्जत, खालापूर, माणगाव, तळा, महाड तालुक्यात सरासरीच्या ५० ते ६० टक्केच पाऊस झाला आहे. सोमवारी (२२ जुलै) जिल्हयातील महाड, माणगाव, कर्जत आणि पोलादपूर तालुक्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. महाडमध्ये सावित्री नदीने रविवारी धोक्याची पातळी ओलांडल्याने जिल्हा प्रशासन यंत्रणा सतर्क झाली होती. चारही तालुक्यांतील शाळांना जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली होती. जिल्यातील पोलादपूर (१४४ मि.मी.) आणि माथेरान (१५५ मि.मी.) येथे सर्वाधिक पाऊस झाला आहे. उर्वरित तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. दिवसभरात जिल्हयात एकूण १५३४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिलह्यातील सावित्रीसह अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाडी या नद्रायंची पातळी आता इशारा पातळी पेक्षा कमी होती. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली होती. जिल्हयात दिवसभरात कुठेही मोठ्या आपत्तीची नोंद झालेली नाही.
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार २३ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट, २४ जुलैसाठी रेड अलर्ट तर २५ आणि २६ जुलैसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील 28 धरणांपैकी बहुतांश धरण परिसरात पुरेसा पाऊस झाल्याने धरणांची पातळी वाढली आहे. 28 पैकी 22 धरणे ही 100 टक्के भरली आहेत. तर अलिबाग तालुक्यातील श्रीगाव (79 टक्के), श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले (77 टक्के), रानिवली (42 टक्के), कर्जत तालुक्यातील साळोख (49 टक्के), अवसरे (45 टक्के), उरण तालुक्यातील पुनाडे (59 टक्के) या धरणांची पाणी पातळी अद्याप कमी आहे.