

पनवेल : बकरी ईदसाठी खरेदी केलेल्या कुर्बानीच्या बकर्याच्या किंमतीवरुन शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी आणि दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी चौघा विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
इरफान शेख (पापडीचा पाडा) येथे राहत असून बकरी ईद असल्याने सलमान शेख, राजू शेख (रा.तळोजा) येथे बकर्यांची कुर्बानी देऊन त्यातून मिळणारे पैसे वाटून घेण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी सहा बकर्यांना कुर्बानी दिली. त्यांना पंधरा हजार रुपये आले.
त्यातील दोन हजार रुपये रशीद याला दिले. उरलेले 13 हजार रुपये इरफान, राजू शेख, सलमान शेख यांच्यामध्ये वाटून घेण्याचे ठरवून इरफान याला साडेचार हजार, सलमान याला साडेचार हजार आणि राजू शेख त्याला चार हजार रुपये वाटून घेऊ असे ठरले.
यावेळी सलमान याने मी पाच हजार रुपये घेणार असे म्हणाला. त्यामुळे त्याच्याशी वाद झाला. त्यानंतर तो शिवीगाळ करून निघून गेला. दुपारी सलमान शेख इरफानच्या घरी आला आणि जुगारात पैसे हरल्याचे सांगून कुर्बानीच्या वाटणीचे पाच हजार रुपये दे असे सांगितले. त्यावेळी त्याला पाच हजार रुपये दिल्याने तो निघून गेला. त्यानंतर सलमान शेख मित्रांबरोबर उभा असताना आज खूप नुकसान झाले दुसरीकडे बकर्या कुर्बानी साठी दिल्या असत्या तर जास्त पैसे मिळाले असते असे बोलला.
यावेळी इरफान याने तुझ्या वाटणीचे पैसे दिले असल्याने आता बोलू नको असे सांगितले. यावेळी शिवीगाळ करत सलमान याने भाऊ सलीम, रहमान, अरबाज यांना बोलावून घेतले आणि त्यांनी इरफान याला लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करून डोक्यात दगड मारला.
या प्रकरणी सलमान मेहबूब शेख, सलीम मेहबूब शेख, रहमान महबूब शेख, अरबाज महबूब शेख यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.