रायगड : नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांचा दणका
पेण : स्वप्नील पाटील
पेणच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूककोंडी आणि त्यातच भर म्हणजे याच गर्दीत दुचाकीस्वारांची वाढती वर्दळ पाहता हे वृत्त दैनिक पुढारीने प्रसिद्ध केल्यानंतर वाहतूक पोलिस आता ऍक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी तातडीने या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, ज्याप्रमाणे वाहतूक पोलिसांनी हा प्रकार मनावर घेऊन जी तातडीने कारवाई सुरू केली आहे, अशीच तत्परता पेण पालिकेने देखील अतिक्रमणे हटवून दाखवावी अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी केली आहे.
पेणच्या बाजारपेठेचा विचार केला असता बाजारपेठेच्या प्रारंभी दोनही बाजूला सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत नो एंट्री असल्याचा फलक लावण्यात आला आहे, तरीदेखील या फलकाकडे दुर्लक्ष करून अनेक दुचाकीस्वार बाजारातील गर्दीचा विचार न करता बेधडकपणे बाजारपेठेमध्ये गाड्या नेत होते. यामुळे बाजारातील ग्राहक आणि दुचाकीस्वार यांच्यात अनेकवेळा शाब्दिक वाद व्हायचे. मात्र बाजारातील या समस्येची दखल दैनिक पुढारीने घेऊन वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आज तातडीने जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी आपल्या पेण क्षेत्रातील वाहतूक पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्यानंतर आज पेणच्या बाजारपेठेत वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईचा बाजारपेठेतील सामान्य नागरिक स्वागत करत असून आता पेण पालिकेने देखील आपल्या कारवाईला लवकरात लवकर सुरुवात करून बाजारपेठ ग्राहकांना खरेदीसाठी मोकळी करावी अशी मागणी पेणमधील नागरीक करीत आहेत.
दैनिक पुढारीचे वृत्त वाचल्यानंतर आम्ही तातडीने पेण शहरात ड्युटीवर कार्यरत असलेल्या आमच्या कर्मचार्यांना पेणच्या बाजारपेठेत ज्या दुचाकी येतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. बाजारपेठेत जे कोणी वाहन घेऊन येईल त्यांच्यावर ही कारवाई होणार असून कोणत्याही वाहन चालकाने सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत बाजारपेठेत वाहन घेऊन येऊ नये.
सोमनाथ लांडे, जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक
पेणच्या बाजारपेठेत नियम धाब्यावर बसवून जे व्यवसाय सुरू आहेत त्यावर तातडीने बंधने लादणे गरजेचे आहे. दैनिक पुढारीने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर वाहतूक शाखेने ज्याप्रमाणे तातडीने कारवाई सुरू केली आहे, त्याप्रमाणे पालिका प्रशासनाने देखील बाजारपेठेतील अतिक्रमण आणि गटारांवरील अनाधिकृत बांधकाम तोडण्याची लवकरात लवकर सुरुवात करावी.
हरिष बेकावडे, सामाजिक कार्यकर्ते

