

पेण; पुढारी वृत्तसेवा : पनवेल ते कळंबोली दरम्यान 20 तासांपूर्वी मालगाडी घसरली. या घटनेनंतर रेल्वेचे डबे व रेल्वे ट्रॅक सुस्थितीत आणण्याचे काम पहाटेपासून सुरू असल्याने कोकण रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्टेशनवरील रेल्वे दोन ते तीन तास थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये रत्नगिरी खेड विनहरे, रोहा, नागोठणा, कासू, पेण जिते, आपटा, सोमताने आशा सर्वच स्टेशनवरील सेवा विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. प्रवाशांना देखील या विस्कळीत सेवेचा त्रास सहन करावा लागत आहे. काही सामाजिक संस्था तसेच महसूल प्रशासनाने प्रवाशांसाठी खाद्य पदार्थांसह पिण्याच्या पाण्याची सोय केली.
रविवारी पहाटेपासून पनवेल कळंबोली येथे रेल्वे मालगाडी घसरल्यामुळे रायगडमधील अनेक रेल्वे स्थानकांवर याचा परिणाम झाला. रोहा रेल्वे स्थानकात त्रिवेंद्रम निजामुद्दीन एक्सप्रेस ही गाडी सकाळ पासुन दुपार पर्यंत रेल्वेस्थानकात उभी होती. कोलाड रेल्वे स्थानकातील गाडी मडगाव उद्यान एक्सप्रेस, रोहा-स्थानकातील त्रिवेंद्रम निजामुद्दीन एक्सप्रेस, नागोठणे स्थानकातील कुडाळ पॅसेंजर या ३ रेल्वे स्टेशनवर उभ्या होत्या.
रविवारी पहाटेपासून पनवेल कळंबोली येथे रेल्वे मालगाडी घसरल्यामुळे प्रत्येक स्टेशनवर रेल्वेत प्रवासी अडकले. रेल्वेतील पाणी संपल्याने स्वच्छतेवर परिणाम झाला होता. पहाटे घरी पोहोचणारे प्रवासी दुपारी २ वाजेपर्यंत अनेक सर्व स्टेशनवर अडकलेले होते. प्रवाशांकडील असलेले खाद्य पदार्थही संपले होते. यामुळे प्रवाशांची जेवणाची, नाश्त्याची गंभीर अवस्था झाली. एर्नाकुलमहुन ओखा व दिवा-सावंतवाडी, जयपूरकडे जाणारी रेल्वे सकाळपासून पेण रेल्वे स्टेशनवर दोन ते तीन तास थांबवून ठेवल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
पनवेल कळंबोली येथे रेल्वे मालगाडी घसरल्याने लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासी गाड्यांचा वाहतुकीवर परिणाम झाला. शिवसेना गटाचे पेण येथील माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर व समर्थकांनी स्टेशनवर भेट देऊन रेल्वेतील प्रवाशांना चहा पाण्यासह खाण्याची सोय केली. एसटी प्रशासनाची मदत घेऊन प्रवाशांना पनवेलपर्यंत एसटी सोडण्याची व्यवस्थाही केली. यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला.
रेल्वे गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना खाद्य पदार्थ व आवश्यक सोयी पुरविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी दिलेल्या निर्देशानुसार रोहा तालुक्यातील महसूल, पोलिस, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रवाशांना मदत करीत खाद्य पदार्थ व पाणी वाटप करण्यात आले. प्रवाशांना जेवण पाकिटे देण्यात आली. प्रवासी रेल्वे गाड्या आणि प्रवाशांना सुरक्षितता व सुविधा पोहोचवत मदत केली. रोहा तहसिलदार किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महसुली विभागातील अधिकारी कर्मचारी, मंडळ अधिकारी तलाठी यांनी प्रवाशांची व्यवस्था केली.