

पनवेल : तोकडे कपडे परिधान करून ग्राहकांशी लगट करीत अश्लील हावभाव व नृत्य सुरू असल्याचा प्रकार पनवेलमधील दोन बारमध्ये पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला आहे. सप्तगिरी बार आणि ग्रिटझ बार अॅण्ड रेस्टॉरंटवर पनवेल शहर पोलिसांनी स्वतंत्रपणे कारवाई केली. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ११ महिला आढळून आल्या. विहित वेळ संपल्यानंतरही महिलांना बारमध्ये थांबवून ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पनवेल शहर पोलिसांचे पथक रात्री गस्तीवर असताना संबंधित बारमध्ये नियमांचे उल्लंघन सुरू असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांच्या आदेशानंतर पंचांसह पोलिसांनी दोन्ही ठिकाणी धाड टाकली.
यमाहा शोरूमलगत असलेल्या सप्तगिरी बारवर रात्री सव्वादहाच्या सुमारास कारवाई करण्यात आली. पोलिस पथक बारमध्ये पोहोचले तेव्हा मोठ्या आवाजात साउंड सिस्टीमवर गाणी सुरू होती. ग्राहक मद्यपान व खाद्यपदार्थांचे सेवन करीत होते. यावेळी काही महिला तोकडे कपडे परिधान करून ग्राहकांशी लगट करीत अश्लील हावभाव व नृत्य करताना आढळून आल्या. या कारवाईत सहा महिला आणि दोन पुरुष वेटर आढळले.
त्यानंतर पोलिसांनी काळुंद्रे येथील जुन्या पुणे-पनवेल महामार्गालगत असलेल्या ग्रिटझ बार अॅण्ड रेस्टॉरंटवर रात्री अकराच्या सुमारास धाड टाकली. येथेही मोठ्या आवाजात साउंड सिस्टीमवर गाणी सुरू होती. ग्राहक मद्यपान करीत असताना काही महिला ग्राहकांशी लगट करून अश्लील हावभाव व नृत्य करीत असल्याचे पोलिसांना आढळले. या कारवाईत पाच महिला आणि दोन पुरुष कर्मचारी आढळून आले.
दोन्ही बारमध्ये विहित वेळेनंतरही महिला कर्मचाऱ्यांना थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच मद्यपानगृह अथवा उपहारगृहात नृत्य करण्यास मनाई असतानाही महिलांकडून अश्लील नृत्य सुरू असल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मॅनेजर व पुरुष कर्मचाऱ्यांनी या प्रकाराला प्रोत्साहन दिल्याचाही आरोप आहे.
या कारवाईनंतर पनवेलमध्ये बारच्या नावाखाली नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नियमांचे उल्लंघन करून ग्राहकांच्या मनोरंजनाच्या नावाखाली अशा प्रकारांना प्रोत्साहन दिले जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या दोन्ही प्रकरणांत संबंधित व्यवस्थापक, कर्मचारी तसेच परवानाधारकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.