

Ajivali Bhatane power line work
रायगड: रिव्हॅम्प्ड डिस्ट्रीब्यूशन सेक्टर स्किम (आर.डी.एस.एस.) योजनेअंतर्गत मंजूर असलेले रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील आजीवली - भातान २२ केव्ही वीज वाहिनी विलगीकरणाचे काम मंगळवारी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. सदर काम पूर्ण झाल्यामुळे आजीवली–भातान परिसरातील ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित होणार आहे.
दरम्यान या कामाच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे दृतगती महामार्ग पनवेलजवळ दुपारी २ ते ३ या वेळेत वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. प्रत्यक्ष कामासाठी तीन ते चार तास लागण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, काटेकोर नियोजन व संबंधित कर्मचारी वर्गाने घेतलेल्या विशेष परिश्रमामुळे हे काम अवघ्या ३५ मिनिटांत पूर्ण करण्यात यश आले. परिणामी महामार्गावरील वाहतूक तत्काळ सुरळीत करण्यात आली.
यावेळी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता एम. बी. राख, सहाय्यक अभियंता विनय महाडिक, व रहमान अत्तार तसेच पनवेल शाखेचे सर्व कर्मचारी प्रत्यक्ष स्थळी उपस्थित होते. मुख्य अभियंता भांडुप परिमंडल संजय पाटील, पेण मंडळ अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड व कार्यकारी अभियंता शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.या कामाच्या यशस्वी अंमलबजावणीस वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शेंडगे तसेच पोलीस निरीक्षक रोंगे व त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.