

खालापूर : एकीकडे जागतिक वनीकरण दिवस साजरा होत असताना दुसरीकडे मात्र औषधी दुर्मिळ झाडांवर सर्रासपणे कुर्हाड चालवली जात असल्याचे विदारक दृश्य खालापुरात पहावयास मिळत आहे. दररोज लागणारे वणवे आणि वृक्षतोड यामुळे वन विभागाचे अस्तित्व नसल्यासारखी परिस्थिती आहे.
खालापूर शहरालगत मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाला खेटून ढापणी डोंगर (साबाई गड ) आहे. या डोंगरावर खालापूर ग्रामस्थांचे ग्रामदैवत देखील आहे. परंतु काही वर्षापासून या डोंगराला दृष्ट लागल्यासारखी परिस्थिती आहे. येथे वन विभागाचे अस्तित्व नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मोठ्या प्रमाणात माती उत्खनन, वृक्षतोड आणि वणवा लावण्याचे प्रमाण वाढले आहे. डोंगरावर असलेली डिंक, जांभूळ झाडाची कत्तल करण्यात आली आहे. याशिवाय रानमेवा असलेली करवंद वणव्यामध्ये होरपळून गेली आहे. कारवीच्या रानासाठी डोंगर प्रसिद्ध असून मानवनिर्मित वणव्यात कारवी देखील जळून गेली आहे. लाकूडफाटा, जळाऊ लाकडासाठी कु-हाड घेऊन लाकूडतोड्यांचा वावर डोंगरावर असून हाकेच्या अंतरावर असलेल्या वनविभागाला जंगलतोड होत असल्याची खबर देखील नसल्याने आश्चर्य आणि संताप वनप्रेमी करत आहेत. वृक्षतोड आणि वनवा यामुळे वन्य प्राण्यांचे निवासस्थान देखील धोक्यात आले आहे. डोंगरावर असलेला माकड आणि मोरांचा वावर जाणवत नसल्याने पर्यावरण प्रेमी निराश आहेत. वनविभागाने क्शन मोडवर येऊन जंगल तोड करणार्या वर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
पुढच्या पिढीला जंगल, डोंगर फक्त फोटोत दाखवण्याची वेळ येईल. वन विभागाकडे कर्मचारी, कायदे असताना देखील उदासीनता यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.
अनिल चाळके, माजी सरपंच, खालापूर
डिंक झाडांची नोंद वन विभागाकडे असते. खालापूर ढापणी डोंगरावर डिंकाची झाडांची संख्या शेकड्यांनी होती. सतत वृक्षतोडीमुळे आता संख्या कमी होत चालली आहे.