Raigad Rain Update : रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी

अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
schools holiday
सर्व शाळा- महाविद्यालयांना सुट्टीfile photo
Published on
Updated on

पनवेल : रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा हा वाढता जोर पाहता हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी उद्या मंगळवारी (दि.७) जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

भारतीय हवामान विभागाने ५ ते ७ जुलैदरम्यान रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात १ जुलैपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूर, दरड कोसळण्याचा आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा धोका निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील सर्व तहसीलदार तथा इन्सिडंट कमांडर यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ७ जुलै रोजी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्याची शिफारस केली होती. या अहवालांचा तसेच हवामान विभागाच्या इशाऱ्याचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली असली तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नियमित कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाजात सहकार्य करावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांनी महत्त्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडावे, तसेच नदी-नाले, धबधबे आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news