

पाचाड (रायगड) : हिंदवी स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी पाहिले आणि आपले सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून ते प्रत्यक्षात उतरवले, त्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पाचाड येथील राजवाड्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. एकेकाळी जिजाऊंच्या वास्तव्याने पावन झालेली ही ऐतिहासिक वास्तू आज केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अखेरच्या घटका मोजत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
संरक्षक भिंती ढासळल्या आहेत, वाड्याचे चिरे निखळून पडत आहेत आणि या ऐतिहासिक स्थळाकडे जाण्यासाठी साधी मुख्य मार्गावर योग्य व्यवस्थाही नाही. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या या अनमोल ठेव्याची अशी अवस्था पाहून शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
किल्ले रायगडावर येणारा प्रत्येक शिवभक्त आणि पर्यटक पाचाड येथील राजवाडा आणि राष्ट्रमाता जिजाऊंच्या समाधीस्थळी नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाही. मात्र, याच ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाकडे भारतीय पुरातत्व विभागाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या राजवाड्याच्या देखभालीसाठी किंवा दुरुस्तीसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे या वास्तूचे अवशेष काळाच्या ओघात नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
आश्चर्याची बाब म्हणजे, एकीकडे रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून किल्ले रायगड आणि परिसरातील वास्तूंचे जतन आणि संवर्धन केले जात आहे. याच प्राधिकरणाने पाचाडच्या राजवाड्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केल्याची माहिती समोर आली आहे. असे असतानाही, केवळ केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असल्याच्या कारणावरून या वास्तूची दुरावस्था होणे, हे अनाकलनीय आणि संतापजनक आहे.
स्वतंत्र निधी उपलब्ध असूनही होणारे हे दुर्लक्ष पुरातत्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. या निष्काळजीपणामुळेच महाराष्ट्राचा हा अमूल्य ठेवा नष्ट होत असल्याची खंत शिवप्रेमी व्यक्त करत असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.