

रायगड : जयंत धुळप
रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून जाहीर केलेल्या राईट टू एज्यूकेशन (आरटीई) अंतर्गत जाहिर केलेली विद्यार्थ्यांची यादी निकषबाह्य, आर्थिकदृष्ट्या उच्च उत्पन्न गटातील, बनावट निवासीपत्ते असलेल्या पालकांच्या पाल्याची असल्याने ती रद्द करण्याची मागणी येथील चिंतामणराव कळकर विद्यालयाचे अध्यक्ष अमर वार्डे यांनी शासनाकडे केली होती.
या तक्रारीवर शासनाने कोणतीही कारवाई केली नाही. मात्र पनवेल तालुक्यांतील खारघर येथील विश्वज्योत हायस्कूलला आरटीआय अंतर्गत शिक्षण विभागाने पाठवलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीतील 13 विद्यार्थ्यांच्या पालकांचे निवासी पत्ते प्रत्यक्ष तपासणी केली असता बोगस असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे शाळा प्रवेश रद्द करण्यात आले असल्याचा लेखी अहवाल पनवेलचे गट शिक्षणाधिकारी सिताराम रामा मोहिते यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्यांना पाठविला असल्याने आरटीआयची प्रवेश यादी निकषबाह्य आहे,यावर शिक्कामोर्तबच झाले असल्याचे अमर वार्डे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगीतले.
रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडूनजाहीर केलेल्या राईट टू एज्यूकेशन (आरटीई) अंतर्गत जाहिर केलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये आरटीआयच्या निकषात न बसणारे, पालकांचे निवासीपत्ते शाळेपासून एक किमी अंतराच्या बाहेरील बनावट आणि खोटे असलेले आणि आर्थिक दृष्ट्या कमकूवत गटातील नसल्याचे निष्पन्न झाल्याने रायगड जिल्हा परिषदेने जाहिर केलेली आरटीआय अंतर्गची यादी रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन गेल्या 24 फेब्रुवारी 2025 रोजी
राज्याचे शाळेय शिक्षणमंत्री दादासाहेब भूसे यांच्यासह रायगडेचे जिल्हाधिकारी किशन जावळे आणि रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भारत बास्टेवाड यांना पाठविले होते. मात्र या निवेदनावर शासनाकडून कोणत्याही प्रकारे कार्यवाही करण्यात आली नाही. आता या यादीत बनावट पालक दिसून येवू लागल्याने रायगड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आरटीआय प्रवेश यादी बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले असल्याचा दावा अमर वार्डे यांनी केला आहे.पनवेलमध्ये एका पालकांनेच केली बोगस कागदपत्रांची तक्रार
दरम्यान पनवेलचे गट शिक्षणाधिकारी सिताराम रामा मोहिते यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्यांना पाठवलेल्या अहवालात, 13 विद्यार्थ्याचे विश्वज्योत हायस्कूल खारघर या शाळेत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीआय 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश निश्चित करण्यात आले होते. मात्र एका पालकाने तक्रार केली की विश्वज्योत हायस्कूल खारघर या शाळेत काही पालकांनी बोगस कागदपत्रे तयार करून आरटीआयसाठी पात्र ठरले आहेत.
तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित शाळेला आरटीआयसाठी पात्र ठरलेल्या सर्व पालकांच्या वास्ताव्याच्या पुराव्याबाबत प्रत्यक्ष पडताळणी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार विश्वज्योत शाळेतील कर्मचार्यांनी प्रत्यक्ष घरी जावून पालकांची पडताळणी केली असता त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पालक राहातच नसल्याचे स्पष्ट झाले, अहवालात म्हटले आहे. त्यानंतर पनवेल गट शिक्षणाधिकारी कार्यालय व शाळेकडून प्रत्यक्ष शाळेत संबंधित पालकांना बोलावून या बाबत कल्पना देण्यात आली. आणि ते संबंधित ठिकाणीच राहतात हे सिध्द करण्यासाठी पुरेसा वाव देण्यात आला. पण पालकांना ते त्या ठिकाणीच राहतातं हे सिध्द करता आले नाही. त्यामुळे त्याचे प्रवेश रद्द करण्यात आले असल्याचे त्यांना कळवण्यात आल्याचे अहवालात नमुद केले आहे.पालकांनी चूकीचा वास्तव्याचा पुरावा जोडून आरटीआयमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरल्यामुळे या विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द करण्याचा निर्णय पडताळणी समितीकडून घेण्यात आला आहे. आपल्या स्तरावरुन या 13 विद्यार्थ्यांचे आरटीआय प्रवेश पोर्टलवरुन प्रवेश रद्द करण्याची कार्यवाही करावी अशी विनंती अखेरीस गट शिक्षणाधिकारी मोहिते यांनी अखेरीस केली आहे.पनवेल मधील बोगस पत्त्यांबाबत गट शिक्षणाधिकार्यांनी मुख्यालयास कळवले आहे. अहवाल प्राप्त होताच त्या बाबतची कारवाई करण्यात येईल. अपात्र विद्यार्थ्यांची नावे आरटीआय यादित असल्याचे निष्पन्न झाल्यास, पडताळणी नंतर त्यांचे प्रवेश रद्द करण्याचे अधिकार तालुकास्तरीय पडताळणी समितीला आहेत.त्याप्रमाणे तालुका स्तरावरच कार्यवाही करण्यात येईल अशी माहिची रायगड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनीता गुरव यांनी दिली