Raigad News | गेल्या 15 वर्षांत 10 हजार खवल्या मांजरांची शिकार

तस्करीमुळे अत्यंत दुर्मीळ प्राण्याचे अस्तित्व धोक्यात; शासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज
Raigad
महाड परिसरात रेस्क्यू करुन खवल्या मांजराला आणताना सिस्केप संस्थेचे सदस्यPudhari News Network
Published on
Updated on

रायगड : जयंत धुळप

तस्करीमुळे कोकणातील खवले मांजर अतीदुर्मिळ वन्यजीवाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेल्या 15 वर्षांत 10 हजार खवल्या मांजरांची शिकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वनविभागाने या प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा अतिशय दुर्मिळ समजली जाणारी ही वन्यप्रजाती नामशेष होण्याची भिती वन्यजीव अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.

खवले मांजर हे जगातील सर्वाधिक तस्करी होणार्‍या वन्यजीव प्राण्यांमध्ये आघाडीवर असल्याची नोंद आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत ही प्रजाती अनुसूची 1 मध्ये समाविष्ट असूनदेखील या प्राण्याच्या तस्करीचा आलेख उंचावत आहे. ही चिंतेची व धोक्याची घंटा आहे. ट्रॅफीक या संस्थेने सन 2009 ते 2017 या आठ वर्षांच्या कालावधीत राज्यात केलेल्या अभ्यासानुसार एकुण 5 हजार 762 खवल्या मांजरांची बेकायदा शिकार झाल्याची नोंद आहे. त्यानंतर म्हणजे सन 2018 ते 2024 या सात वर्षांच्या कालावधीत जवळपास तीतक्याच खवल्या मांजरांची शिकार झाल्याचा अंदाज विविध प्राणीमित्र व प्राणी संरक्षण क्षेत्रात कार्यरत संस्था-संघटनांच्या नोंदींवरुन सांगता येईल.

परिणामी 2009 ते 2024 या 15 वर्षांच्या कालखंडात किमान 10 हजार खवल्या मांजरांची शिकार झाली असून हे प्रमाण अत्यंत गंभीर आहे. मात्र त्यांच्या प्रतिबंधासाठी वन विभागा वा अन्य कोणतीही शासकीय यंत्रणा यांचाकडून अपेक्षीत उपाययोजना होत नसल्याची व्यथा सिस्केप या प्राणीपक्षी संरक्षण संवर्धन क्षेत्रात गेल्या चाळीस वर्षांपासून कार्यरत संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ पक्षीप्राणी अभ्यासक प्रेमसागर मेस्त्री यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील तिसरा शनिवार हा जागतिक खवले मांजर दिवस म्हणून जगभरात पाळला जातो.यंदा 15 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यात व देशात विविध ठिकाणी सुरु असलेल्या प्राणी संरक्षण व संवर्धन प्रकल्पांतर्गत जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. सिस्केपचे सदस्य प्राणीमित्र यांच्या माध्यमातून देखील खवल्या मांजरांच्या संरक्षण व संवर्धनाकरिता जनजागृती मोहीम ग्रामीण व जंगल भागाजवळच्या गावांमध्ये सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पक्षीप्राणी अभ्यासक प्रेमसागर मेस्त्री बोलत होते. खवल्या मांजर ज्याला इंग्रजीमध्ये पँगोलिन म्हटले जाते. हा फॉलिडोटा वर्गातल्या मॅनिडी कुळातील मॅनिस प्रजातीतील सस्तन प्राणी आहे.

संपूर्ण कोकणात अनेक ठीकाणी खवल्या मांजरांचे अनेक नैसर्गिक अधिवास (हॅबिटॅट) आहेत, मात्र त्यांचे हे अधिवास नष्ट होत चालले असल्याने त्यांच्या संरक्षणाकरिता गेल्या काही वर्षांपासून जनजागृती करण्याची मोहीम सुरु आहे. खवल्या मांजरांचे अतिशय संवेदनशील नैसर्गिक अधिवास दिवसेंदिवस नष्ट होत असून, त्यांच्या बचावाकरीता नव विभाग वा शासनस्तरावरुन कोणतीही ठोस उपाय योजना होताना दिसत नाही. नविन विकास प्रकल्पांकरिता आणि शेती बागायत विकासाकरिता तंत्रज्ञान विकसीत होत चालले आहे. त्यात जमिन उत्खनन करणारे महाकाय जेसीबी, पोकलँड मशीन, सुरूंग आदींचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. जंगलतोड आणि उत्खनन यावर कोणतेच निकष ठरविण्यात आले नाहीत. निकष ठरवलेच तर त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे प्राण्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत खवल्या मांजरांचे अस्तित्वच नष्ट होत असल्याची व्यथा प्रेमसागर मेस्त्री यांनी पूढे मांडली आहे.

ओरिसामार्गे चीन बेकायदा तस्करीचा मार्ग

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा असे खवल्या मांजरांच्या तस्करांचे जाळे पसरले आहे. स्थानिक आदिवासी बांधवांकडून खूप कमी पैशात हे खवले मांजर विकत घेतले जाते. जीवंत खवल्या मांजर आणि त्याचे अवशेष यांच्या नियोजनपूर्वक बेकायदा तस्करीचे मार्ग उत्तरप्रदेशात गोरखपुर, अलाहाबाद आणि दिल्लीत पोहोचतात. पुढे ओरिसामध्ये दलालांमार्फत त्यांचे दर ठरवून बंगाल, सिक्किम राज्यातील छुप्या मार्गे म्यानमार, व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशीया आदी देशांकडून चिनमध्ये खवले मांजर वा त्यांचे अवशेष पाठवले जातात. ओरीसा राज्यातील कारवाईत 154 खवले मांजर आढळले तर त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 135 खवले मांजर तस्करीत आढळले असल्याचे मेस्त्री यांनी सांगीतले.

खवल्या मांजरांच्या तस्करीत महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर

ट्रेड रेकॉर्डस नालिसिस ऑफ फ्लोरा अँड फाउना इन कॉमर्स आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ - इंडिया यांनी खवले मांजरांच्या होणार्‍या शिकारी बद्दलची माहिती प्रकाशीत केली आहे. खवल्या मांजरांच्या तस्करीत आणि तस्करीकरता पकडलेल्यांमध्ये देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. भारतातील खवले मांजर तस्करीत वर्षाकाठी 342 बेकायदा तस्करीच्या घटनांमध्ये अवैध वन्यजीव व्यापारासाठी 1 हजार 203 खवले मांजरांची शिकार झाल्याचे नोंद असल्याचे त्यांनी पूढे सांगितले.

खवल्या मांजराची तस्करी कशासाठी?

खवल्या मांजराचे मांस आणि खवल्यांचा उपयोग प्रामुख्याने चायनिज आणि व्हियतनामी पारंपरिक औषधे तयार करण्यासाठी केला जातो. स्केली बॉडी असणारा हा प्राणी अँटीटर म्हणूनही ओळखले जातो. त्यांचे खवले हे डेड केराटीन नामक प्रोटीनने बनलेले असतात. मानवी केस आणि नखांमध्ये हेच प्रोटीन असते. त्यात काही औषधी गुणधर्म आहेत असे म्हटले जाते परंतू वास्तवात तसे नसल्याचे मेस्त्री यांनी अखेरीस सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news