

श्रीकृष्ण द.बाळ
महाड ः महाड पोलीस निरीक्षक रमेश बामन्या तडवी यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून थेट आत्महत्येचा इशारा दिला आहे. लिहिलेल्या लेखी पत्रात आपल्या विरोधात आपण खालच्या जातीचे असल्याचे सांगत अन्यायकारक कार्यवाही झाली आहे. आपली पुन्हा बदली केल्याचे नमूद करून याप्रकरणी न्याय न मिळाल्यास आपण लवकरच टोकाचे पाऊन उचलणार आहे. असा लेखी इशारा पत्राद्वारे दिल्याने संपूर्ण रायगड मधील पोलीस खात्यासह एकच खळबळ उडाली आहे.
महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात अन्यायाचा पाढा
या संदर्भात शनिवारी दुपारी महाड पोलीस ठाण्यामध्ये रमेश तडवी यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली असता, त्यांनी प्रभारी महाड उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या अहवालानुसार मागील महिन्यातील झालेल्या दोन घटनांचा उल्लेख करून आपल्या विरोधात रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी तातडीने बदलीची कारवाई केल्याची माहिती दिली. पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या या लेखी पत्रात त्यांनी आपल्यावरील झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला असून यापूर्वी देखील आपल्यावर झालेल्या अन्याय विरोधात आपण मॅट मध्ये जाऊन न्याय प्राप्त केला होता ,ज्यामुळे बदली आदेश रद्द होऊन आपली महाड शहर पोलीस निरीक्षक म्हणूनच 10 सप्टेंबर 25 रोजी पुन्हा नियुक्ती झाली होती याची आठवण करून दिली आहे.
तर सर्वांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा
आपण भिल्ल आदिवासी म्हणजेच खालच्या जातीचे असल्यानेच आपली जाणीवपूर्वक बदली अलिबाग पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आल्याचे पत्रात नमूद केले आहे. हे सर्वथा अयोग्य असून याकरिता त्यांनी तत्कालीन रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे ,विद्यमान जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे ,पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा अलिबाग मिलिंद खोपडे व महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने हे जबाबदार आहेत. या सर्वांनी मिळून आपणास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचे नमूद करुन, आपण आत्महत्या केल्यानंतर या सर्वांच्या विरोधात वारंवार मला जातीवाचक बोलून अपमान केला म्हणून ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
मंत्रीमहोदयांच्या मुलाला सहकार्य करण्यासाठी दबाव
या लेखी पत्रात डिसेंबर महिन्यामध्ये महाडमध्ये झालेल्या एका गुन्ह्याचा हवाला देऊन या प्रकरणी वरील पैकी अधिकाऱ्यांनी माझ्याकडे तीघां विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून दबाव आणला होता. असे नमुद केले आहे. महाड शहर पोलीस ठाणे येथे नगरपालीका निवडणुक वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच शिवसेना शिंदे गट यांचेमध्ये वाद झाला होता. सदर भांडणामधून महाड शहर पोलीस ठाणे येथे परस्पर विरोधी दोन गुन्हे दाखल झाले होते. गुन्हा रजि नंबर 178/2025 मध्ये भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले हा आरोपी होता. त्याला सहकार्य करण्यासाठी अपर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवधरे, उपविभागीय पोलीस अधिकारी महाड शंकर काळे, पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे यांनी बनाव करून बेकायदेशीर तिन इसमांना मला अटक करण्यासाठी सांगत होते. परतू मी त्याना अटक केली नाही. यामुळे त्यांना राग आला आणी त्यांनी माझी विनाकारण बदनामी करण्यास सुरवात केली.
20 फेब्रुवारीला पुन्हा बदली,अखेर आत्महत्येचा निर्णय
मी सदर प्रकारा बाबत पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांना माहिती दिलेली होती. परतू त्यांनी वरील लोकांचे ऐकून माझी काहीएक चूक नसताना फक्त मी खालच्या जातीचा आहे. या कारणास्तव माझी 20 फेब्रुवारी 2026, रोजी महाड शहर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी ते नियंत्रणकक्ष अलिबाग अशी बदली केलेली आहे. सदर बदली आदेशामुळे मी तसेच माझे कुंटूब प्रचंड ताण तणावाखाली गेलेले आहे. माझ्यावर वांरवार होणारा अन्याय आता मला तसेच माझे कुंटूबाला सहन होत नसल्याने मी स्वतः तसेच माझे सोबत माझे कुटूंब असे आम्ही आत्महत्या करीत असून माझे तसेच माझे कुंटूबांच्या आत्हत्येला हे अधिकारी जबाबदार राहणार आहेत. असे पत्रात अखेरीस नमुद केले आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या पत्नीशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी देखील कोणतीही नोटीस न देता जाणीवपूर्वक रमेश तडवी यांच्यावर विभागाकडून अन्याय केला जात असल्याचे नमूद करून सायंकाळी काही काळ ते फोन बंद करून बाहेर गेले होते व त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता असे सांगितले. दरम्यान याबाबत सायंकाळी उशिरा पोलीस कार्यालयातून रमेश तडवी रायगड परिसरात गेल्याची माहिती प्राप्त झाली संध्याकाळी उशिरा त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पुन्हा महाड पोलीस ठाण्यामध्ये आणल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली.
पोलीस निरिक्षक रमेश तडवी हे त्यांच्या कुटूंबासह घरी आहेत. त्यांच्या बरोबर चर्चा सूरु आहे. काही समस्या असल्यास वरिष्ठांशी चर्चा करण्यास त्यांना आम्ही सागि.तले आहे. त्यांच्या बरोबर चर्चा पूर्ण झाल्यावर वस्तूस्थिती नेमकी काय आहे, या बाबत माहिती देता येईल.
- सविता गर्जे, उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्थन तथा अतिरिक्त प्रभार महाड