Raigad News | पाणी नियोजनासाठी कळसवलीचे ‘जल अंदाजपत्रक’

राजापुरात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नवा पायंडा; ग्रामसभेत एकमुखी ठराव
Kalsavli water budget plan
पाणी नियोजनासाठी कळसवलीचे ‘जल अंदाजपत्रक’pudhari photo
Published on
Updated on

चिपळूण शहर : राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीने आपल्या गावचे जल अंदाजपत्रक ग्रामसभेत सादर करून पाण्याविषयी संपूर्ण अंदाजपत्रक मांडण्याचा कोकणात नवा पायंडा सुरू केला आहे. जल अंदाजपत्रक मांडणार्‍या ग्रामपंचायतीमध्ये हा पहिलाच धोरणात्मक निर्णय असल्याचे सांगितले जात असून, राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रा.पं.ने हा मान मिळविला आहे.

संपूर्ण जगाला आज ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न भेडसावत आहे. त्याचा मुख्य परिणाम निसर्गावर तर प्रामुख्याने पाण्यावर होत आहे. जलतज्ज्ञ अभ्यासकांच्या मते भविष्यात युद्ध हे पाण्यासाठी अर्थातच जलयुद्ध होण्याची भीती व्यक्त होत आहे. हे चित्र एकीकडे असतानाच दुसरीकडे मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील कळसवली ग्रा.पं. ने धोरणात्मक निर्णयाच्या माध्यमातून जल अंदाजपत्रक ग्रामसभेत सादर केले. त्याला सर्व उपस्थितांनी एकमुखी पाठिंबा दिला. पाण्याचा लेखा जोखा तयार करुन असे जल अंदाजपत्रक ग्रामसभेत मांडणारी कळसवली ही ग्रामपंचायत पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

पाणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि पाण्याची बचत ही काळाची गरज आहे याचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायत कळसवलीने यावर्षी जलअंदाजपत्रक तयार केले आहे. ज्याप्रमाणे दरवर्षी आर्थिक अंदाजपत्रक तयार करतो त्याप्रमाणे पाण्याचा सुद्धा जमा आणि खर्च ठेवायला हवा. त्यानुसार या जल अंदाजपत्रकामध्ये कळसवली ग्रामपंचायत अधिकारी सोनाली आराख यांनी अतिशय सखोल लेखाजोखा मांडला आहे.

गत पावसाळ्यात कळसवली ग्रामपंचायत हद्दीत पडलेल्या पावसाची नोंद व गावाची पाण्याची गरज लक्षात घेऊन या कळसवली ग्रामपंचायतीने हे पाण्याचे अंदाजपत्रक तयार केले आहे. कळसवली गावात सद्यस्थितीत 9 सार्वजनिक विहिरी, 1 सिमेंटचा मोठा बंधारा व 5 सार्वजनिक पाणी साठवण टाक्या असून, सद्यस्थितीत असणारा पाणी साठा व साधारण पावसाळ्यापर्यंत ग्रामस्थांची पाण्याची गरज याच बरोबर परिसरातील प्राणी पक्षी व शेतीसाठी लागणारे पाणी या सगळ्या बाबींचा या अंदाजपत्रकात विचार करण्यात आला आहे. पाणी हे जीवन आहे, त्यामुळे त्याचा वापर जपून करणे गरजेचे आहे. भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर रुप धारण करण्याअगोदरच पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

कळसवली ग्रामपंचायतीने राबवलेला हा उपक्रम भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी महत्वाचा असुन अन्य ग्रामपंचायतीनी याचा आदर्श घेवुन असे नियोजन करायला हवे. कोकणातही अनेक गावे साधारण फेब्रुवारी महिण्यापासुन पाणीटंचाईचा सामना करत असतात. दरवर्षी शासन जनतेला पाणी देण्यासाठी करोडो रुपये टँकरवर खरच करत आहे. गेल्या अनेक वर्षापासून शासन स्तरावरुन टँकरमुक्तीची चालवली जाणारी चळवळ अशा जल अंदाजपत्रकांमुळे आणखी बळकट होऊन अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सहज सुटू शकतो.

जल लेखा परीक्षण...

या वर्षीच्या पावसाळ्यात किती मिलीमिटर पाऊस पडला, त्यातील किती पाणी कसे व कुठे गेले आणि त्यातील शिल्लक पाण्यातून मानवाची गरज, पशू-पक्षांची गरज, शेतीसाठीची गरज तसेच उद्योग धंद्यासाठी पाण्याची गरज भागवून शिल्लक राहणारे पाणी आणि या शिल्लक पाण्याचा पुढील वापर व साठा याबाबत अतिशय सखोल असे जल अंदाजपत्रक सादर करण्यात आले. त्यानुसार जल लेखापरीक्षण सुद्धा करणेत आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news