

सुवर्णा दिवेकर
अलिबाग : रायगड जिल्ह्यात होळी आणि त्यानंतर येणारा धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपारीक साजरा करण्यात आला. या सणाच्या निमित्ताने चाकरमानी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दाखल झाले आहेत. सोमवारी रात्री जिल्ह्यात ठिकठिकाणी 4 हजार 60 होळ्यांचे दहन करण्यात आले तर मंगळवारी अबालवृध्दांनी एकमेकांना रंग लावून धुळवडीचा सण उत्साहात साजरा केला.
कोकणात गणेशोत्सवानंतर होळीचा सण मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाला शिमगोत्सव असेही संबोधले जाते. सणाच्या निमित्ताने चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होत असतात. यंदाही मुंबईतील चाकरमानी कोकणात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. होळीच्या सणाच्या निमित्ताने गावागावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. देवदेवतांच्या पालख्याही काढण्यात आल्या. दक्षिण रायगडात पारंपारीक पद्धतीने रात्री होळीची पूजा करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी होळीच्या फागा म्हणत होळीभोवती फेर धरला. फागा संपल्यानंतर बोंबा मारत होळीचे दहन करण्यात आले.
जिल्ह्यात यावर्षी 2 हजार हजार 940 सार्वजनिक, तर 1 हजार 120 खासगी अशा एकूण 4 हजार 60 होळ्यांचे दहन करण्यात आले. यासाठी सुपारी, नारळ, केळीचे झाडे आणि सावर आणुन होळ्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. होळी भोवती झेंडूच्या पुलांची आरास करण्यात आली होती. कोळीवाड्यात काही ठिकाणी पौराणीक आणि ऐतिहासिक देखाव्यांचे चलचित्रांची उभारणी करण्यात आली होती. रात्री 11 नंतर सर्वत्र होलीकांचे दहन करण्यात आले.
मंगळवारी सकाळपासून उत्तर रायगडात धुळवडीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. अबालवृध्दांनी एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या. यात तरूणाई आघाडीवर होती. होळकर्यांचे घोळके ढोलताशे वाजवत गल्लोगल्ली रंग उधळत फिरत होते. अलिबाग समुद्रकिनारी रंग खेळणार्यांची जणू जत्राच भरली होती. रंगात रंगलेले होळकरी समुद्रात डुंबायला उतरले होते. काही अतिउत्साही होळकर्यांमुळे पोलीस यंत्रणेवर ताण पडलेला पहायला मिळाला.
बच्चे कंपनीच्या हातात पिचकारी तर तरूणाईच्या हातात सुके रंग होते. हे रंग घेऊन एकमेकांना रंगांची आंघोळ घालीत होते. होळकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे नाक्यानाक्यावर बुरा ना मानो होली है! म्हणत सर्वांना वेगवेगळया रंगात रंगवून टाकत होते. अगदी ओळखीचे चेहरेही रंगल्यामुळे अनोळखी झाले होते. होळीवर आधारित जुनी, नव्या हिंदी-मराठी गाणीही वाजत होती. शहरात आणि गावात होळीच्या सणात सारेच मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. तरूण-तरूणी डिजेच्या तालावर नाचत होती. एकमेकांना रंगात रंगवत होती. रंगाच्या या सणात तरूणाई बरोबरच वयोवृद्ध ही सहभागी झाले होते.
होळी आणि धुलीवंदनाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. किनारा परीसरात वाहने चालवण्यास मज्जाव करण्यात आला होता तसेच दारू पिवून समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी जाणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांना कारवाई करण्याचा इशाराही पोलीसांनी दिला होता. पोलीसांनी ठेवलेल्या बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता होळी आणि धुळवडीचा उत्साहात साजरा झाला.
रायगडातील अलिबाग,मुरुड, श्रीवर्धन, उरण या तालुक्याना विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. सलग चार दिवस सुटया आल्याने पर्यटक मोठया संख्येने रायगड जिल्हयात दाखल झाले आहेत. त्यांच्याबरोबरच आज स्थानिक गावकरी, शहरातील नागरिक या समुद्र किनारी मोठ्या संख्येने आल्याचे पहायला मिळाले. स्थानिकांबरोबरच आलेल्या पर्यटकांनी धुळवड साजरी करीत समुद्र स्नानाचा आनंद लुटला.