

महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर जवळ वनविभागाने धाडसी कारवाई करत अवैध खैराची तस्करी करणारा ट्रक पकडला आहे. गुजरात राज्यातून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रकमधून खैर वृक्षाचे २०१ ओंडके जप्त करण्यात आले असून, ट्रकसह रस्ता दाखवणाऱ्या दुचाकीस्वारालाही वनविभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरून (क्र. ६६) एक संशयास्पद ट्रक (MH 12 EQ 9866) जात असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. या ट्रकला रस्ता दाखवण्यासाठी पुढे एक 'यामाहा FZ' दुचाकी (MH 03 DQ 6109) चालत होती. वनविभागाच्या पथकाने सापळा रचून दोन्ही वाहने अडवली असता, ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध खैराचे लाकूड आढळून आले.
या प्रकरणी वनविभागाने दोन संशयीत आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद अरसद (रा. गुलशन नगर, बलसाड, गुजरात) आणि मोहम्मद उस्मान नुरुद्दीन खान (रा. खिंडीपाडा, मुलुंड कॉलनी, मुंबई) अशी त्यांची नावे आहेत.
संशयीत आरोपींवर भारतीय वन अधिनियम १९२७ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
७ लाखांचे लाकूड आणि वाहने जप्त
या कारवाईत खैराचे २०१ तुकडे (अंदाजे ४.५७३ घनमीटर) जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ७,०१,८६६ रुपये इतकी आहे. लाकडासह ट्रक आणि दुचाकी अशी दोन्ही वाहने वनविभागाने ताब्यात घेतली आहेत.