

महाड-नाते : इलियास ढोकले
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रत्येक वर्षी होणार्या गडकोट मोहीम गेल्या दोन दिवसांपासून पोलादपूर व महाड परिसरात असून सोमवारी दुपारी ऐतिहासिक खर्डी गावामध्ये या धारकरी मावळ्यांना महाप्रसाद देण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवार (दि.10) सायंकाळी उशिरा हे धारकरी पाचाड नेवाळेवाडी येथे मुक्कामासाठी जातील अशी माहिती प्रतिष्ठानच्या वतीने प्राप्त झाली आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव यांसह संपूर्ण राज्यभरातील सुमारे 50 हजारपेक्षा जास्त धारकरी मावळे या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
पोलादपूर तालुक्यातील उमरट येथे 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी या मोहिमेचे आगमन झाले. त्यानंतर 8 फेब्रुवारी रोजी महाड तालुक्यातील वरंध विभागातील कातिवडे या गावी तर 9 फेब्रुवारीला रायगड विभागातील आयरेकोंड येथे या धारकरी मंडळींनी रात्री वास्तव्य केले. या धारकरी मंडळींबरोबर काही वेळ यात्रेत सहभागी होऊन त्यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान त्यांनी आपल्या गावांतून आपण या ठिकाणी सात तारखेला सर्वांसमवेत सहभागी झाल्याची माहिती दिली.
दिवसा होणारा प्रवास वगळता रात्री उशिरा श्री गुरुजींच्या आदेशानुसार शौर्य गीत तसेच अन्य कवायतीचे कार्यक्रम व वरिष्ठांकडून मार्गदर्शन केले जाते अशी माहिती दिली.पोलादपूर व महाड तालुक्यात धारकरी मंडळांना स्थानिक नागरिक तसेच स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक असणारी सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचे या धारकरी मंडळींनी आवर्जून सांगितले. मागील काही महिन्याच्या तुलनेत सध्या या भागात थंडी कमी असल्याचे या युवकांकडून सांगण्यात आले. सुमारे 50 हजार युवक धारकरी मावळे म्हणून या मोहिमेमध्ये सहभागी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सहभागी झालेल्या धारकर्यांमध्ये 17 वयापासून 50 वयापर्यंत धारकर्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. प्रतिवर्षी प्रतिष्ठानचे प्रमुख भिडे गुरुजी यांच्या आदेशानुसार ही गडकोट मोहीम राबविली जाते,असे नमूद केले. यापूर्वी 2014 या वर्षी किल्ले रायगडावर गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते, याची आठवण या प्रतिष्ठानच्या वतीने करून देण्यात आली . 11 फेब्रुवारी रोजी नेवाळेवाडी येथून सकाळी किल्ले रायगडावरील होळीचा माळ येथे सर्व मावळे प्रयाण करतील व त्या ठिकाणी या चार दिवस सुरू असलेल्या गडकोट मोहिमेचा समारोप होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, या मोहिमे संदर्भात महाडचे प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे, डीवायएसपी शंकर काळे, महाड तहसीलदार महेश शितोळे यांनी स्थानिक ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत या धारकरी मावळ्यांसाठी तातडीने आवश्यक असणारे पाण्याचे नियोजन तसेच आरोग्य व्यवस्था प्रत्येक निवासासह मार्गावर विविध ठिकाणी उपलब्ध केल्याची माहिती दिली. महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शंतन डोईफोडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बावडेकर यांनी देखील आपल्या विभागाची जवळपास 20 ते 22 पथके या विविध मार्गांवर तैनात केल्याची माहिती देऊन आवश्यक असणारा औषधोपचार तातडीने देण्यास विभागाने तयारी ठेवण्याले निदर्शनास आणले.
या मार्गावर रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे. पोलादपूरसह महाड तालुक्यात ज्या गावातून या मोहिमेतील धारकरी प्रवास करीत आहेत, त्या मार्गांवर स्थानिक नागरिक व विशेष करून महिला मंडळाकडून त्यांचे भव्य स्वागत करण्यात येत असल्याने धारकरी मंडळींकडून समाधान व्यक्त होत आहे. 11 फेब्रुवारी रोजी किल्ले रायगडावरील होळीचा माळ येथे या मोहिमेचा समारोप होणारा असून या कार्यक्रमाला मंत्री भरत गोगावले यांसह राज्यातील विविध मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.