

रोहे : महादेव सरसंबे
न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे सांगितल्यानंतर येत्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात होईल असेच चित्र दिसून येत आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत आदीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
कालावधी संपून बराच काळ लोटलेल्या काही स्थानिक स्वराज्य संस्थावर सध्या प्रशासन काम बघत आहे. यातीलच रोहा अष्टमी नगरपरिषदेची कालावधी संपून बराच काळ लोटला आहे. येत्या काही कालावधीतच रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या निवडणुका होणार असल्याचे गृहीत धरून सारेच मागील सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवार कामाला लागण्याचे दिसून येते. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी, शिवसेना (उभाठा), शिवसेना (शिंदे गट) हे पक्ष सुद्धा कामाला लागल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाची ताकद रोहयामध्ये कमी असल्याने भविष्यात हा पक्ष नव्याने काय मोर्चा बांधणी करणार याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. निवडणुका होणार हे निश्चित झाल्यानंतर सारेच पक्षाचे इच्छुक उमेदवार प्रभागातील कामाकडे जातीने लक्ष देताना दिसत आहेत.
गेली कित्येक वर्ष रोहा अष्टमी नगर परिषदेवर खा. सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाची एक हाती सत्ता होती. सातत्याने मित्र पक्षांना सोबत घेत रोहा अष्टमी नगरपरिषदेमध्ये काही नगरसेवक सोबतीला नेहमीच होते. तर मागील कालावधीचा विचार करता शिवसेनेचे (उबाठा) नगरसेवक निवडून आले होते. वर्तमान स्थितीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाला शिवसेना (उबाठा) टक्कर देणार असे चित्र असताना तालुकाप्रमुख समीर शेडगे आपला प्रमुख कार्यकर्त्यांसह खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याने शिवसेनेची ताकद कमी होताना दिसली व राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढली. समीर शेडगे येण्याने राष्ट्रवादी पक्षात प्रामुख्याने शहरातील नेत्यांची यावेळी भाऊ गर्दी होताना दिसली. या भाऊ गर्दीमध्ये नक्की कोणाला उमेदवारी मिळेल हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आतापर्यंतच्या रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारांची पसंती पाहता राजकारणात चतुर असलेले खासदार सुनील तटकरे यांनी निवडणुकीच्या अंतिम क्षणी म्हणजे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक धक्के दिल्याचे दिसून आल्याने यावेळी नेमका कोणाला धक्का बसणार? कुणाचा पत्ता कट होणार हे अंतिम क्षणी दिसून येईल.
रोहा अष्टमी शहरात भाजपचा काहीसा मतदार हा ठाम आहे. यापूर्वी भाजप ताकतीने नव्हता. परंतु या निवडणुकीत भाजप तरुण फळी घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करताना दिसत आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष मित्र पक्षाला सोबत घेते का? अथवा सारेच राष्ट्रवादी वगळता उर्वरित पक्ष एकत्रित येवुन निवडणूक लढवतील का? हे निवडणूक लागल्यानंतर चित्र स्पष्ट दिसून येईल.
शिवसेना (शिंदे गट) ने रोहा शहरात काही ठिकाणी काम केले आहे. हे काम लोकांसमोर घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनीही केले आहे. भाजपप्रमाणे शिवसेना उबाठाची मते सुद्धा ठाम आहेत. प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात लढून शिवसेनेचा उमेदवार नगरपरिषद निवडणुकीत निवडून आलेले दिसून आले आहे. दुसरीकडे काँग्रेस नेतृत्व रोहा शहरात कोणती भूमिका घेते का नेहमीप्रमाणे सत्तेत सहभागी ही भूमिका घेणार हे निवडणूक जाहीर झाल्यानंतर दिसून येईल.
रोहा अष्टमी निवडणुक जाहीर झाल्यास राष्ट्रवादी पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी आहे. राष्ट्रवादी पक्ष वगळता अन्य पक्षाला उमेदवारीसाठी मात्र चांगला चेहरा शोधवा लागणार आहे. या निवडणुकीत त्यांना उमेदवार प्रत्येक प्रभागात शोधावा लागणार हेही तेवढेच सत्य आहे. रोहा अष्टमी शहरात सातत्याने मतांची गोळा बेरीज सत्ताधारी व विरोधकात पाच-दहा टक्क्याचा फरक दिसून आला आहे. उमेदवार निवडून आणण्यात मात्र राष्ट्रवादी नेहमीच सरशी ठरली आहे. यावेळी मतांची गोळा बेरीज कुठला पक्ष जमेची करून घेईल यावरून ही निवडणूकीचा सत्ता स्थान ठरेल.