

रायगड : रायगड जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबाग शहरा जवळच्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशनल ट्रस्टच्या शासनमान्य चिंतामणराव केळकर विद्यालयात शिकणार्या तब्बल 2 हजार विद्यार्थ्यांच्या आरोग्यास, शाळे जवळच सुरु करण्यात आलेल्या बेकायदा डंपींग ग्राऊंडमुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे. या बाबत दत्ताजीराव खानविलकर एज्यूकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष अमर म. वार्डे यांनी स्थानिक चेंढऱे ग्रामपंचायत आणि रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांना लेखी तक्रार देवूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
चिंतामणराव केळकर विद्यालय शाळेच्या मैदानाच्या उत्तर दिशेकडे चेंढरे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने डंपीग ग्राऊंड करण्यात आलेले आहे. त्याच्या फोटोंसह अमर वार्डे यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांना तक्रार पत्र पाठविले आहे. 9 जून 2025 रोजी ग्रामपंचायतीला लिहिलेल्या पत्रासोबत पाठविलेले 2 फोटो व 5 जुलै रोजी काढलेले डंपींग ग्राऊंडचे फोटो या पत्रासोबत पाठविले आहेत. 18 जून रोजी ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांनी शाळेला पत्र पाठवून असे डंपींग ग्राऊंड तयार केलेले नाही, असे धडधडीत असत्य कळविले असल्याचे वार्डे यांनी या पत्रात म्हटले आहे.
शाळेसाठी तसेच रस्त्यासाठी सर्व्हे नं. 98/1 हा भुखंड दिलेला आहे. त्याच भुखंडाच्या एका बाजूला हे डंपींग ग्राऊंड ग्रामपंचायतीच्या सहकार्याने अस्तीत्वात आले आहे. या जागेचे मुळ मालक देखील या बेकायदा डंपींग ग्राउंडच्या बाबत ग्रामपंचायतीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रयत्नात आहेत, याचीही नोंद घ्यावी,असे या पत्रात वार्डे यांनी म्हटले आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आपले गांव, आपले शहर स्वच्छ ठेवा, या साठी सतत डांगोरा पिटून शाळांच्याच कुंपणाच्या भितांवर स्वच्छ भारत अभियाने संदेश रंगवून जनजागरण करणार्या शासन यंत्रणेस शाळेच्या जवळ स्वच्छता राखणे अनिवार्य आहे याचा विसर पडलेला दिसून येत आहे. त्याच बरोबर शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेसाठी संस्कार करण्याकरिता त्यांचे प्रबोधन करण्याकरिता शाळांमध्ये येणारे आणि स्वच्छता रॅलींमध्ये देखील त्याच शालेय विद्यार्थ्यांना आपल्या सरकारी स्वच्छता अॅप मधील रकाने भरण्याकरिता सहभागीकरुन घेणार्या शासन यंत्रणेस आपण त्यांच विद्यार्थ्यांचा आरोग्यास धोका पोहोचवत आहोत याचे सुवेरसुतक नाही, ही गंभीर बाब या निमीत्ताने समोर आली आहे.
2000 विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोकादायक परिस्थिती निर्माण करण्याला सहाय्य करणारे चेंढरे ग्रामपंचायतीचे प्रशासक ज्ञानेश्वर साळावकर आणि चेंढरे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी निलेश लक्ष्मण गावंड यांना खोटी माहिती दिल्याबद्दल निलंबीत करावे आणि हे डंपींग ग्राऊंड तत्काळ बंद करण्याची कार्यवाही करावी अशी विनंती वार्डे यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांना केली आहे.