पनवेल : खांदा वसाहतीमध्ये एक-दोन दिवसांपासून विविध ठिकाणी अनेक कावळे काही मृत स्थितीमध्ये तर काही अस्वस्थ अवस्थेमध्ये आढळून येत आहेत.
दोन दिवसांपूर्वी पहाटेपासून मोठया प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे अनेक नागरिकांना पहाटे वेळी फिरायला जात असताना त्रास होत होता. मात्र यावर कोणताही राजकीय पक्ष तसेच सरकारी अधिकारी प्रशासन लक्ष दिले नाही. तळोजा येथून अनेक वेळा केमिकलयुक्त पाणी नदीत सोडले जात आहे. त्याचे परिणाम खांदा वसाहत खारघर, कामोठेला सोसावे लागत आहे.
नागरिकांना श्वास घ्यायला त्रास होतो तर त्या ठिकाणी असलेले पशू-पक्षांचे काय? याचा परिणाम आता दिसून येत आहे. खांदा वसाहतीमध्ये एक-दोन दिवसांपासून कावळे मृत स्थितीमध्ये दिसत असताना पालिका प्रशासन माहिती घेऊन पुढे असे घडू नये म्हणून पावले उचलवी, अशी मागणी पुढे येत आहे. हा महिना पितृ पक्ष सुरु झाला असून अनेक जण सर्वपित्री अमावस्येला केळीच्या पानांवर जेवण ठेवतात आणि कावळ्याची आठवण काढतात मात्र अश्या घटना घडल्यास भविष्यात कावळा चित्र लहान मुलांना दाखवावा लागले. गेल्या काही वर्षात झालेल्या नागरीकरणामुळे पशुपक्षांचा अधिवास नष्ट झाला असल्याने त्यांची संख्या कमालीची घटत चालली आहे. त्यातच प्लास्टीकचाही परिणाम नैसर्गिक अधिवासावर होत आहे.