

पोलादपूर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर येथे ३० मे रोजी झालेल्या भीषण कार अपघातात गंभीर जखमी झालेले कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक नियंत्रक अनिल मरकड यांचे मंगळवारी (९ जून) उपचारादरम्यान निधन झाले. या दुर्दैवी अपघातात मरकड यांच्या पत्नी सुवर्णा मरकड आणि कन्या अनुश्री यांचा आधीच मृत्यू झाला होता. अनिल मरकड यांच्या निधनामुळे या भीषण अपघातातील बळींची संख्या तीन झाली असून संपूर्ण मरकड कुटुंब यात उद्ध्वस्त झाले आहे.
अनिल मरकड हे आपल्या कुटुंबासह अहमदनगर येथील मूळ गावी सुट्टी घालवून दापोलीकडे कारने परत येत असताना पोलादपूर येथील हॉटेल बालाजीजवळ उभ्या डंपरला त्यांच्या कारची जोरदार धडक बसली होती. कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेल्याने हा अपघात अत्यंत भीषण ठरला. या दुर्घटनेत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ सहयोगी अधिकारी असलेल्या सुवर्णा मरकड आणि कन्या अनुश्री यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर मुलगा चिन्मय याच्या हाताला दुखापत झाली होती.
अनिल मरकड यांना गंभीर अवस्थेत पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे गेल्या दहा दिवसांपासून ते अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत होते. अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे अवघ्या १४-१५ वर्षांच्या चिन्मयच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र पूर्णपणे हरपले असून, सध्या तो नगर येथे आजी-आजोबांच्या छायेत आहे. दापोलीतील जालगाव येथील रहिवासी असलेल्या मरकड कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखाच्या डोंगरामुळे कोकण कृषी विद्यापीठ आणि परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.