Raigad News | खाडीपट्ट्यात पावसाच्या आगमनापूर्वी शेती कामांना वेग

मशागतीची कामे सुरू; उन्हाचा पारा चढला तरी शेतकरी शेतात; सरपण साठवण्याची लगबग
खाडीपट्टा, रायगड
खाडीपट्ट्यातील ग्रामीण भागात सध्या उन्हाचा पारा भयंकर वाढला असला, तरी पावसाळा जवळ येत असल्याने शेती मशागतीच्या कामाने वेग घेतला आहेPudhari News Network
Published on
Updated on

खाडीपट्टा : रघुनाथ भागवत

खाडीपट्ट्यातील ग्रामीण भागात सध्या उन्हाचा पारा भयंकर वाढला असला, तरी पावसाळा जवळ येत असल्याने शेती मशागतीच्या कामाने वेग घेतला आहे. शेतकरी भर उन्हातही काळ्या आईची सेवा करीत असल्याचे चित्र सध्या खाडीपट्टयात पाहायला मिळत आहे. तर शेतीची बांधबंदिस्ती करण्याबरोबरच तरवे लावून मशागतीच्या कामामध्ये सध्या शेतकरीराजा रममाण झाला असल्याचे प्रत्यक्ष फेरफटका मारला असता पाहायला मिळाले.

अधिक जोमाने शेती फुलवण्यासाठी प्रयत्न

महाड तालुक्यासह खाडीपट्टा भागामध्ये यंदा एप्रिलमध्येच तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहचला असून उन्हाच्या असह्य झळांमुळे भल्या पहाटेपासूनच शेतकर्‍यांची कामासाठी लगबग सुरू होत आहे. शेतकर्‍यांना उन्ह डोक्यावर घेऊनच शेतात राबावे लागत आहे. शिमगोत्सव संपल्यानंतर एप्रिलसह मे महिन्यात लग्नाचा धुमधडाका जोरात सुरु असून प्रत्येक गावात लग्नाची मोठी धामधूम ऐकायला मिळत आहे. हे सर्व करता करता शेतकरी राजा आपल्या शेतीकडे दुर्लक्ष करीत नाहीत हे विशेष आहे. शेतकर्‍यांनी अधिक प्रमाणात आपल्या शेतीकडे लक्ष देऊन यावर्षी अधिक जोमाने शेती फुलवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

पावसाळयापूर्वीची शेतीची कामे पूर्ण करण्याचे उद्दीष्ट

मागील कित्येक दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे व अवकाळी झालेल्या तुरळक पावसामुळे यंदा पावसाळा लवकरच ठेपेल असे संकेत वाटत असल्याचे सांगून त्याच पार्श्वभूमीवर पावसाळयापूर्वीची शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. शेतीच्या कामांबरोबरच लाकूडफाटा, सुका गवत यांच्यासह विविध कडधान्यांची खरेदी त्यांना उन्ह दाखवणे, पापड आदी पावसाळच्या कामांची सर्व तयारी मोठया जोमाने सुरु असल्याचे नागरिकांनी सांगितले. सध्या येथील शेतकरी काळ्या आईच्या मशागतीत मग्न झालेला असून बैलजोडीच्या मदतीने मशागतीचे कामे दुर्मिळ होत चालली असली, तरी काही ठिकाणी बैलजोडीने तर काही ठिकाणी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. नांगरणी, वखरणी या कामाचा यात समावेश आहे.

सर्वत्र शेती मशागतीची लगबग

दरम्यान, यंदा वेळेवर पाऊस पडण्याची शक्यता असून त्याप्रमाणे शेतकर्‍यांनी शेतीची कामे सुरू केली आहेत. तापमान अधिक असल्याने मजूर कामावर यायला तयार नाहीत. दुपारी 4 नंतर पुन्हा कामांना वेग येत आहे. गेली अनेक वर्षे निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा गंभीर परिणाम होऊन मोठे नुकसान सोसावे लागत आहे. कधी वरुण राजाचे उशिरा आगमन, तर कधी वेळेत हजर होऊन पुन्हा खूप दिवस गायब होणार्‍या पावसामुळे केलेली पेरणी वाया जात आहे, मात्र अशा सगळया प्रसंगांना तोंड देत येथील शेतकरी ठाम उभा असून कोसळून न जाता त्याच जोमाने पुन्हा तयारीला लागतो. यंदा वरुण राजाचे लवकर आगमन होईल अशा सार्‍या आशा, आकांक्षा ठेवत शेतकरी पूर्वतयारीसाठी मशागतीच्या कामाला लागला आहे. सर्वत्र शेती मशागतीची लगबग सुरू झाली असल्याचे सर्वत्र चित्र पाहायला मिळत आहे.

दुपारनंतर कामांना वेग

यंदा वेळेवर पाऊस पडण्याची शक्यता असून त्याप्रमाणे शेतकर्‍यांनी शेतीची कामे सुरू केली आहेत. तापमान अधिक असल्याने मजूर कामावर यायला तयार नाहीत. दुपारी 4 नंतर पुन्हा कामांना वेग येत आहे. गेली अनेक वर्षे निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा गंभीर परिणाम होऊन मोठे नुकसान सोसावे लागत आहे. कधी वरुण राजाचे उशिरा आगमन, तर कधी वेळेत हजर होऊन पुन्हा खूप दिवस गायब होणार्‍या पावसामुळे केलेली पेरणी वाया जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news