Raigad News | समुद्रकिनारी वाहन चालविणाऱ्या टेम्पो चालकावर गुन्हा दाखल
रेवदंडा : रेवदंडा येथे काही दिवसांपुर्वी फेरारी गाडी समुद्र किनारी चालविल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा समुद्र किनारी बेफिकीरीने टेम्पो ट्रॅव्हलर्स चालविल्याबद्दल रेवदंडा पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेवदंडा किनारी के.ई.एस. शाळेच्यापाठीमागील बाजूस रेवदंडा समुद्र किनारी येथे टेम्पो ट्रॅव्हलर्स ( एम.एच. १२ एस.एफ. ६३४८) वरील पुणे येथील चालक श्रीकांत मल्लीनाथ गाळगे यांनी त्यांची गाडी रेवदंडा समुद्र किनारी खोलवर अतिवेगाने हयगयीने व बेदरकारपणे आतमध्ये समुद्राचे वाळूवर चालवून स्वतःचे व पायी चालत असणारे ग्रामस्थ तसेच पर्यटकांचे जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य केले. याबाबत रेवदंडा पोलिस ठाणे येथे पोलिस हवालदार सुग्रिव्ह अभिमान गव्हाणे यांच्या फिर्यादीनुसार गु.र.न. २/२०२५, मोटर वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४, भारतीय न्याय सहिता २०२३ चे १२५, एम. व्ही. एसिटी १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोहवा महेंद्र अंबू राठोड हे करत आहेत.
दरम्यान, किनारी भागात अशी वाहने चालविण्यावर बंदी असतानाही उत्साही पर्यटक आपली वाहने बिनधास्तपणे समुद्राच्या पाण्यात घालताना दिसत असल्याचे सर्रासपणे दिसत आहेत. या वाहनचालकांमुळे पायी चालणाऱ्या पर्यटकांना चालणेही मुश्किल होते. अनेकदा छोटे, मोठे अपघातही घडतात. त्यामुळे पोलिसांनी या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, सध्या पर्यटन हंगाम सुरू झालेला आहे. जिल्ह्यातील सर्वच समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी होत आहे. बंदोबस्तासाठी किनाऱ्यावर अपुरा पोलीस बंदोबस्त असतो. याचाच गैरफायदा घेत अतिउत्साही पर्यटक मोठ मोठ्या आवाजात हॉर्न वाजत बेफानपणे वाहने समुद्र किनाऱ्यावर घालत असतात. यातूनच अपघाताच्या घटनाही अनेकदा घडलेल्या आहेत. हे अत्यंत चिंताजनक झालेले आहे.

