Raigad News | वणव्यांमुळे रायगडमधील 3 हजार हेक्टर वनक्षेत्राची हानी

गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात लागले एक हजार वणवे; 90 टक्के मानव निर्मित; वनसंपदेला वाढता धोका
अलिबाग, रायगड
वणव्यांमुळे नैसर्गिक साधन संपत्तींची तर हानी होतेच आहे, त्याचबरोबर जंगलातील पशुपक्ष्यांचे अस्तित्वही धोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

अलिबाग : सुवर्णा दिवेकर

सातत्याने लागणार्‍या वणव्यांमुळे रायगड जिल्ह्यातील वनसंपदा सध्या धोक्यात आली आहे. पाच वर्षात 1 हजार वणवे लागले आहेत. ज्याची 3 हजार 71 हेक्टरवरील वन क्षेत्राला वणव्यांची झळ बसली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वणव्यातील 90 टक्के वणवे हे मानवनिर्मित आहेत. वणव्यांमुळे नैसर्गिक साधन संपत्तींची तर हानी होतेच आहे, त्याचबरोबर जंगलातील पशुपक्ष्यांचे अस्तित्वही धोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे.

Summary

रायगड जिल्ह्यात 35 हजार हेक्टर खासगी, तर 1 लाख 7 हजार हेक्टर सरकारी वनक्षेत्र आहे. यात माथेरानसह फणसाड आणि कर्नाळा अभयारण्य परिसराचाही समावेश आहे. अत्यंत दुर्मीळ वन्य प्रजाती येथे वास्तव्य करतात. हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरवातीला जंगलांना वणवे लागण्याचे प्रकार सुरू होतात.

वणवामुळे वनसंपत्तीची मोठी हानी होते. 2018-19 मध्ये वणवे लागण्याच्या जिल्ह्यात 207 घटना घडल्या. यात 887 हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले. 2019- 20 मध्ये वणवे लागण्याच्या तब्बल 174 घटना घडल्या. यात 571 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. 2020-21 मध्ये डिसेंबर अखेर वणवे लागण्याच्या 134 घटनांची नोंद झाली. यात 306 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील वनसंपदा बाधित झाली. 2021-22 मध्ये 355 वणवे लागले, ज्यात 703 हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले. 2022-23 मध्ये 355 वणवे, 2023-24 मध्ये 155 वणवे लागले. ज्यात 286 हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले. तर 2024- 25 मध्ये 95 वणवे लागण्याच्या घटना समोर आल्या, ज्यात 200 हून अधिक हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले.

वणव्यामुळे औषधी वनस्पती नष्ट

सातत्याने लावल्या जाणार्‍या या आगींमुळे कोकणातील वनसंपदा अडचणीत आली आहे. वन्यजीवांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. पशुपक्ष्यांचे हकनाक बळी जातात. सुरुवातीला जंगलापुरता मर्यादित असणारा हा प्रश्न आता आसपासच्या परिसरासाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. अनियंत्रित वणवे आता जंगलालगतच्या गावात शिरण्याच्या घटना मागील काही वर्षात समोर आल्या आहेत. वणव्यांमुळे प्रदेशनिष्ठ वनस्पती धोक्यात येत आहे. यात प्रामुख्याने गवताळ कुरणे, दगडफूल, सोनकी प्रकार, कारवी जाती, पानफुटी, कलारगा झाडी, तेरडा, श्वेतांबरी, रानआले, सोनजाई, गजकर्णिका, रानकेळी, सापकांदा, टोपली कारवी, कुळी कापुरली संजीवनी, सर्पगंधा, अश्वगंधा यांसारख्या वनस्पतींचा समावेश आहे. तर घुबड, चंडोल, रॉबिन रानकोंबडया, मोर, सापांच्या प्रजाती गवतावरील कीटक, उंदीर, भेकरे यांसारख्या पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुर्वी मुबलक प्रमाणात आढळणारे वन्यजीव आता दिसेनासे होत चालले आहेत. कोकणात 184 प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातीही वणव्यांमुळे अडचणीत सापडल्या आहेत.

वणव्यामुळे पशुपक्ष्यांचे अधिवास नष्ट

वणव्यामुळे पशुपक्ष्यांचे अधिवास नष्ट होतो, एकदा अधिवास नष्ट झाला तर वनजीव्यामध्ये असुरक्षितेची भावना निर्माण होते. त्यामुळे वन्यजीव या परिसरातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सातत्याने लागणारे वणवे रोखणे गरजेचे आहे. लोकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी प्रबोधन करणे आणि वणवे रोखण्यासाठी लोकसहभाग वाढवणे, आवश्यक आहे अन्यथा कोकणातील सदाहरीत वनांचे अच्छादन नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.

वन्यजीवांची सुरक्षितता धोक्यात

स्थानिकांमध्ये असलेला गैरसमजातून हे वणवे लावले जातात. जंगलांना वणवे लावले की पुढील वर्षी जंगलात चांगले गवत उगवते. हे गवत जनावरांच्या चार्‍यासाठी उपयुक्त ठरते. म्हणून दरवर्षी उन्हाळ्यात जंगलांना आगी लावल्या जातात. दुसरीकडे सरपणाला लाकूड मिळावे, म्हणूनही वणवे पेटवले जातात. वणव्यांमुळे झाडे सुकतात आणि पर्यायाने हे लाकूड सरपणासाठी तोडली जातात. कधी कधी शिकारीसाठीही हे वणवे लावले जातात. वणवा लागल्याने वन्यजीव सुरक्षिततेसाठी आगीच्या विरुध्द दिशेने पळण्यास सुरूवात करतात. मात्र याच वेळी दबा धरून बसलेले शिकारी वन्यजीवांची सावज टिपतात.

वणव्यांवर तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी वनविभागातर्फे सतत ऑनलाईन देखरेख केले जाते. वनविभागाच्या संकेत स्थळावर रिअल टाइम वनक्षेत्राचा अहवाल मिळतो. त्यात कुठे वणवा लागला आहे, त्याचे स्वरूप किती, हे संबंधित विभागाला समजते. त्याप्रमाणे संबंधित अधिकारी कर्मचार्‍यांना सूचना करून वणवा विझवण्याची तात्काळ कार्यवाही करतात.

राहुल पाटील, उपवनसंरक्षक, अलिबाग, रायगड

वनविभागाकडून उपाययोजना

जिल्ह्यात वनक्षेत्र खूप जास्त आहे. पण त्या तुलनेत वनविभागाकडे असणारा कर्मचारी वर्ग अतिशय कमी आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचारी वर्गाचा वापर करून वनसंवर्धनाचे काम केले जात आहे. पण त्याला मर्यादा पडतात. त्यामुळे वणवे रोखणे जिकरीचे काम ठरते. अनियंत्रित वणव्यांना रोखण्यासाठी अलिबागच्या वन विभागाने फायर ब्लॉ या यंत्राचा वापर सुरु केला आहे. उप वनसंरक्षक अलिबाग याच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या 11 परिक्षेत्राना फायरब्लॉ ही अद्यावत यंत्रे देण्यात आली आहेत. या यंत्राद्वारे फायर लाईन मारणे, आग विझवणे या सारखी कामे जलदगतीने केली जातात. या शिवाय हॅलो फॉरेस्ट सारखी शीघ्र प्रतिसाद देणार्‍या हेल्प लाईनची सुरवात केली आहे. मात्र तरीही वणवे लागण्याचे प्रमाण कमी झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news