

म्हसळा : म्हसळा तालुक्यातील पांगळोली ग्रामपंचायतीमध्ये 28 लाखाचा अपहार झाला असल्याची तक्रार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव जाधव यांनी दिली आहे. याप्रकरणी तत्कालीन सरपंच आणि तलाठी यांच्यावर गुन्हा नोंद झाला. याठिकाणी कुंपणच शेत खात असल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, म्हसळा तालुका खाडीपट्टा विभागातील पांगळोली ग्रामपंचायतमध्ये तब्बल २८ लक्ष ९ हजार ५५४ रुपयांचा अपहार झाल्याची फिर्याद म्हसळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव जाधव यांनी पोलिस ठाण्यात केली आहे. गुन्हा नोंदवून फिर्यादीनी दिलेल्या तक्रारीवरून तत्कालीन सरपंच नबाब अजिज कौचाली आणि ग्रामसेवक गणपती मच्छींद्र केसकर या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. दोनही आरोपींनी १ एप्रिल २०१५ ते २९ ऑगस्ट २०१८ या तीन वर्षाचे कारकीर्दीत सुमारे २८ लक्ष ९ हजार ५५४ चा अपहार केल्याची तक्रार गटविकास अधिकारी माधव जाधव यानी केली आहे. खुद्द पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी तक्रार दिली असल्याने अनेक ग्रामसेवक, सरपंच यांचे धाबे दणानले आहेत. तर काही ग्रामसेवक आपले कामकाज पूर्ण करण्याचे तयारीला लागले आहेत. प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेऊन गावगाडा चालवीत असताना प्रथम नागरिक म्हणून सरपंच महोदयांनी येणाऱ्या काळात अधिक सजग राहिले पाहिजे अशी चर्चा सुरु आहे.