

Mhasla Wadamba woman killed car hit
म्हसळा: वाडांबा एस.टी. स्थानकासमोर भरधाव कारने (एम.एच.०३- बी.सी.९४६२) पादचारी प्रवासी महिलेला ठोकर मारून फरफटत नेले. यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (दि.५) दुपारी १२ च्या सुमारास घडला. किशोरी किसन जावळेकर (वय ४५, रा.केलटे) असे मृत महिलेचे नाव आहे. यावेळी मृत महिलेसोबत प्रवास करणाऱ्या अंगणवाडी सेविका दैवबलवत्तर म्हणून बचावल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीवर्धन राज्य मार्गावरील वाडांबा गावाच्या एस. टी.स्थानकावर केलटे व गाणी येथील अंगणवाडी सेविका या दोघीजणी श्रीवर्धनहून म्हसळाकडे येणाऱ्या एस.टी.मधून वाडांबा स्थानकावर उतरून त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी हमरस्ता ओलांडत होत्या. यावेळी म्हसळा बाजूने श्रीवर्धनकडे जाणाऱ्या कारने महिलेला जोराची धडक देवून फरफटत नेले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवले आणि त्यांच्या पथकाने रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल होत मदतकार्य केले. म्हसळा पोलिस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक संदिप कहाले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
गणेश उत्सवात म्हसळा तालुक्यात लागोपाठ अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत. ३१ ऑगस्टरोजी खामगाव कासारमलई येथे झालेल्या रिक्षा अपघातात कणघर गावातील दोन पुरुष व एक महिला असे तीन जण ठार झाले आहेत.
दैव बलवत्तर म्हणून मी वाचले
या अपघातात थोडक्यात बचावलेल्या गाणी येथील अंगणवाडी सेविका यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही दोघीजणी सोबतच रस्ता ओलांडत असताना अवघी एक पाऊल मागे असलेल्या मृत किशोरी जावळेकर यांना कारने ठोकर मारली. तर माझे दैव बलवत्तर म्हणून मी या अपघातातून सुखरूप बचावली.
वाडांबा स्थानकावर सातत्याने रहदारी वाढली आहे. काही वर्षापूर्वी येथे तीन ते चार अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. एस.टी.स्थानक परिसरात रस्त्यावर ब्रेकर व झेब्रा क्रॉसपट्टे, सिग्नल लॅम्प, सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.