

महाड : राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो आंबेडकरी अनुयायांच्या उपस्थितीत महाडमध्ये आज मनुस्मृतीदहनाचा 97 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
मनुस्मृतीच्या शिकवणीमुळे धर्माच्या रचनेत विषमता मानली जात असे. महिलांना त्यांच्या मूलभूतअधिकारांपासून दूर ठेवले जात असे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृतीचे दहन केले. हा दिवस महाड येथे मनुस्मृती दहन दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रातून दरवर्षी या दिना निमित्ताने हजारो दलित बांधव अभिवादन करण्यासाठी महाड येथे येत असतात. या दिनाचे स्मरण म्हणून याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
आज मनुस्मृतीदहन दिनानिमित्ताने भिमसैनीकांची महाडच्या क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्याकरीता एकच गर्दी केली होती.महाड तसेच राज्यातील आंबेडकरी चळवळीतील अनेक सामाजिक, राजकीय, संघटनांच्या प्रतिनिधींनी महाडमध्ये हजेरी लावली होती. यामुळे महाडच्या व चवदारतळे तसेच क्रांतीस्तंभ परीसर भिमसैनिकांनी गजबजून गेला होता. वंचित दलित महिला मंडळाच्या डॉ. प्रमिला संपत या गेली अनेक वर्ष महाडमध्ये महिला मुक्ती दिनानिमीत्त महिलांची रॅली काढून सभा घेत आहेत. यावर्षी देखील शाहू,फूले,डॉ.आंबेडकरांचा जयघोष करत क्रांतीस्तंभ,चवदारतळे मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक अशी रॅली काढण्यात आली व स्मारकाबाहेरील डाँ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
महाड शहरात या मनुस्मृती दहन दिनानिमीत्त विविध संघटनांचे कार्यक्रम झाले. यावेळी बौद्धजन पंचायत समितीकडून घेण्यात आलेल्या अभिवादन सभेस बौद्धजन पंचायत समिती सभापती आनंदराज आंबेडकर,मनिषा आंबॆडकर,डॅा.प्रमिला संपत हे उपस्थित होते. यावेळी परभणीतील संविधान अवमान प्रकरण,सोमनाथ सुर्यवंशी मृत्यु प्रकरण याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमस्थळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.