पेण : पाच हजारांची लाच घेताना मळेघर ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाला शुक्रवारी (दि.११) अटक करण्यात आली. पेण तालुक्यातील मळेघर ग्रामपंचायत हद्दीतील घराचा असेसमेंट उतारा देण्यासाठी ग्रामसेवकाने लाचेची मागणी केली होती. नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पेण येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. परमेश्वर सवाईराम जाधव (वय ४८) असे या ग्रामसेवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार हे वकील असून त्यांचे आशिल यांना कोर्टाच्या कामकाजासाठी त्यांच्या वडगाव (ता. पेण) येथील घराचा असेसमेंट उतारा गरजेचा होता. तो मिळण्यासाठी त्यांनी मळेघर येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना १७ मार्चला अर्ज केला होता. ते वयोवृद्ध असल्याने त्यांनी असेसमेंट कागदपत्र मिळण्यासाठी तक्रारदार यांच्या नावे गुरूवारी (दि.१०) कुलमुक्त्यार पत्र तयार करून दिले होते. त्यानुसार तक्रारदार यांनी लोकसेवकांशी संपर्क साधत कामाबद्दल फोनद्वारे विचारणा केली असता ग्रामसेवकाने त्यांच्याकडे पाच हजाराच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी मुंबई येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार शुक्रवारी लोकसेवक परमेश्वर जाधव याला पाच हजाराची लाच घेताना सापळा रचून मुंबई लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली.